Maharashtra VS Karnataka border dispute: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. बेळगावातील मराठी भाषिक महामेळाव्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे. मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बेळगावात पुन्हा एकदा कन्नडिगांच्या दडपशाही पहायला मिळत आहे. बेळगाव प्रश्नावर बोलताना आमदार हसन मुश्रीफ यांनी मोठा दावा केला आहे.
9 डिसेंबरपासून कर्नाटक सरकारचं बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा महाअधिवेशन आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या अधिवेशनाला कर्नाटक प्रशासनाने परवानगी नाकारलेली आहे. शिवाय या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या नेत्यांना देखील बंदी घालण्यात आलेली आहे.
या अधिवेशनाची तयारी करणाऱ्या एकीकरण समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची धरपकड देखील सुरू झाल्याचा दावा बेळगाव मधील एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांनी केला आहे. कर्नाटक सरकारचा बंदी आदेश झुगारून महाराष्ट्रातील काही नेते बेळगाव मध्ये या आधी आले होते. मात्र अस धाडस आता राज्यातील कोणतेच नेते दाखवत नसल्याबद्दल देखील त्यांनी खंत व्यक्त केली. दरम्यान आज प्रकाश मरगाळे यांनी कोल्हापुरात शरद पवार यांची भेट घेतली, यावेळी पवारांनी आजच आपण मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा करू असं आश्वासन दिले आहे.
बेळगावातील हिवाळी अधिवेशनाच्या मुद्याचे तीव्र पडसाद उमटले. मराठी नेत्यांना बंदी घालणं चुकीची असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टानं तातडीनं निर्णय घ्यावा असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय.बेळगावात मराठी भाषिकांवर अन्याय होत असून 868 गावं महाराष्ट्रात येण्यासाठी उत्सुक आहेत असही मुश्रीफ म्हणालेत.
तर, शिवसेनेचे नेते बेळगावला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. उदय सामंत आणि अन्य दोन नेते सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. तर बेळगाव प्रश्नावरून आम्ही मराठी माणसांच्या बाजूनं आहोत, असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय. बेळगावच्या मुद्यावरून राजकारण कायम पेटत राहिलेलं आहे. आता पुन्हा एकदा मराठी नेत्यांना बंदी घातल्यानं नव्या वादाची सुरुवात झालीय. सरकार यात मध्यस्थी करणार का, यातून कसा मार्ग निघणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.