आधारकार्डवर नावाऐवजी लिहिलं होतं असं काही, शिक्षकही झाले हैराण

आधाराकार्ड सोशल मीडियावर व्हायरल, शाळेत मुलीच्या अॅडमिशनवेळी झाला खुलासा

Updated: Apr 4, 2022, 04:41 PM IST
आधारकार्डवर नावाऐवजी लिहिलं होतं असं काही, शिक्षकही झाले हैराण title=

उत्तर प्रदेश : प्रत्येक भारतीयांचा आधार म्हणजे त्यांचं 'आधार कार्ड' (aadhar card). रेल्वेच्या अरक्षणापासून ते सिम कार्डच्या खरेदीपर्यंत आज सर्वत्र आधार कार्ड हा महत्वाचा दस्तावेज आहे. मुलांच्या शाळेच्या अॅडमिशनसाठी आधारकार्ड महत्त्वाचं मानलं जातं.

पण उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये आधार कार्ड बनवताना मोठा निष्काळजीपणा झाल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार पाहून सर्वच हैराण झाले आहेत. आधार कार्ड बनवणारे किती बेफिकीर आहेत याचं हे उदाहरण आहे. आधारकार्ड मिळाल्यानंतर आपल्या मुलीला शाळेत अॅडमिशन घेण्यासाठी गेल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला.

उत्तर प्रदेशमधल्या बदायूं इथल्या बिलसी, तहसील भागातील एक व्यक्ती आपल्या मुलाला प्रवेश घेण्यासाठी प्राथमिक शाळेत पोहोचला, पण शिक्षकाने त्याला प्रवेश देण्यास नकार दिला. कारण होतं आधार कार्डवर असलेलं मुलीचं नाव.

मुलीच्या नावाऐवजी आधारकार्डवर चक्क 'मधू का पांचवा बच्चा' असं नोंदवण्यात आलं होतं. आधाराकार्डवर असं नाव पाहिल्यानंतर शिक्षकांनी या मुलीच्या वडिलांना आधारकार्ड दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या.

सोशल मीडियावर आधार कार्ड व्हायरल
'मधूचे पाचवे मूल' लिहिलेलं आधार कार्ड सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे. बिलसी तहसील भागातील रायपूर गावात राहणाऱ्या दिनेशला 5 मुलं आहेत. त्यांची तीन मुले गावातीलच प्राथमिक शाळेत शिकतात. पाचवी मुलगी आरतीला प्रवेश घेण्यासाठी दिनेश शाळेत पोहोचला तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या शिक्षिका एकता वार्ष्णेय यांनी नाव नोंदणीसाठी आधारकार्डची मागणी केली. आधार कार्डवर आरतीच्या नावाऐवजी 'मधूचे पाचवे मूल' असे लिहिण्यात आलं होतं.

आरतीचे वडील दिनेश यांना आधार कार्डमध्ये नाव दुरुस्त केल्यानंतरच प्रवेश घेण्यास या असं शिक्षकाने सांगितलं असून अशा चुकांकडे दुर्लक्ष करू नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे. 

अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
आधारकार्डमध्ये अशाप्रकारे निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आल्यानंतर बदायूंच्या जिल्हाधिकारी दीपा रंजन यांनी सांगितलं की, बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड बनवले जात आहेत. ही बाब माझ्या निदर्शनास आलेली नाही. असं झालं असेल तर तो मोठा निष्काळजीपणा आहे. बँक आणि पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांना सतर्क केलं जाईल आणि असा निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.