लखनऊ : उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एका सरकारी फतव्यामुळे कर्मचाऱ्यांवर वेगळेच संकट कोसळलेय. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. एक व्यक्ती टॉयलेटमध्ये स्टुलावर बसलेला दिसत आहे. मात्र, ही व्यक्ती दुसरी तिसरी नसून सरकारी शाळेचे मुख्याध्यापक भगवती प्रसाद आहेत. याचे कारण तसेच आहे. नव्या सरकारी फतव्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आलेय. सरकारी आदेशानुसार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरी टॉयलेट आहे की नाही या पुरावा द्यावयाचा आहे. त्यामुळे भगवती प्रसाद यांनी टॉयलेटचा पुरावा म्हणून दिलाय.
याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिलेय. काही दिवसांपूर्वी सीतापूर जिल्हा दंडाधिकारी शीतल वर्मा यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलाय की, सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या घरात टॉयलेट आहे का, याचा अहवाल जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांना पाठविण्यात यावा. तसेच ऑक्टोबर २०१८ पर्यंत देशातील जास्तीत जास्त गाव शौचालय मुक्त करायचे आहेत. त्यामुळे सर्वांच्या घरी टॉयलेट असायला हवे.
जिल्हा दंडाधिकारी शीतल वर्मा यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सर्व सरकारी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या टॉयलेटचा फोटो जिह्ला पंचायत अधिकाऱ्यांना पाठवला पाहिजे. जे पाठवणार नाहीत त्यांना पगार मिळणार नाही. जर २७ मे पर्यंत प्रत्येकांने फोटो पाठविले नाहीत तर त्यांचा पगार रोखला जाईल.
भगवती प्रसाद राज्यातील सर्वात जास्त कर्मचारी असणाऱ्या शिक्षण विभागात येतात. शिक्षण अधिकारी अजय कुमार यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना फोटो पाठविण्यास सांगितले. त्यानुसार भगवती प्रसाद यांनी कडी करत असा फोटो पाठविलाय. दरम्यान, दुसऱ्या विभागाने या आदेशाला विरोध दर्शविला आहे. हा आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे.