बंगळुरू : कर्नाटकमध्ये निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसनं जातीचं कार्ड खेळलंय. राज्यात मोठ्या संख्येनं असलेल्या लिंगायत आणि वीरशैव समाजाला वेगळ्या धर्माची मान्यता देण्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतलाय. या निर्णयानंतर कर्नाटकमधल्या लिंगायत नागरिकांनी एकच जल्लोष केलाय.
येत्या एक-दीड महिन्यात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात. त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर कर्नाटकचे कायदामंत्री टी.बी. जयचंद्र यांनी याबाबत माहिती दिली. भरपूर चर्चा आणि विचारविनिमय केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा मिळाला तरी अन्य अल्पसंख्यकांवर त्याचा परिणाम होणार नसल्याचा दावाही जयचंद्र यांनी केलाय.