IIT Madras Director: हिंदू धर्मात गायील माता मानले जाते. गायीच्या दुधाचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. गाईचे शेण, गोमूत्र याचे अनेक गुणधर्म सांगितले जातात. दरम्यान गायीच्या गोमूत्रामुळे आपण तापातून बरे झाल्याचा दावा एका व्यक्तीने केलाय. ही व्यक्ती कोणी सर्वसाधारण व्यक्ती नाहीय तर आयआयटी मद्रासचे संचालक पदावर काम करणारी आहे. होय. आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते गोमूत्राच्या औषधी गुणधर्मांची प्रशंसा करताना दिसत आहेत. काय आहे या व्हिडीओत? जाणून घेऊया.
आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतोय. यात ते म्हणतात, एकदा मला खूप ताप आला तेव्हा मी गोमूत्र प्यायलो आणि लगेच बरा झालो. आता त्यांच्या विधानावर काँग्रेसपासून ते द्रमुक नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. हे एक लज्जास्पद विधान असल्याची टीका हे नेते करत आहेत.
15 जानेवारी 2025 रोजी मट्टू पोंगलनिमित्त गो संरक्षण शाळेमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिथे कामकोटी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार मांडण्यासाठी बोलावले होते.
आपल्या भाषणाची सुरुवात करताना कामकोटी यांनी स्थानिक गायींच्या जातींचे संरक्षण आणि सेंद्रिय शेती स्वीकारण्याचे महत्त्व सांगितले. इथपर्यंत सर्वकाही ठिक होतं. पण यावेळी त्यांनी गोमूत्राने ताप बरा होण्याची कहाणी सांगितली. यावर उलटसुलट प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांनी गोमूत्राच्या अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि पचन सुधारण्याच्या गुणधर्मांबद्दल सांगितले. मोठ्या आतड्यांशी संबंधित आजार 'इरिटेबल बोवेल सिंड्रोम' सारख्या समस्यांसाठी उपयुक्त असल्याचे ते म्हणाले. जो आहे. आता त्यांच्या विधानामुळे तामिळनाडूमध्ये राजकारण तापलंय. द्रमुक आणि काँग्रेस पक्षाचे नेते त्यांच्या विधानाचा निषेध करत करतायत. दुसरीकडे भाजप नेत्यांनी कामकोटी यांच्या विधानाचे कौतुक केले आहे.
மூளை வலிமை அதிகம் கொண்ட கும்பல் ஆட்சியில் ஐஐடி இயக்குநர் லட்சணத்தை பாருங்கள்.. கோமியம் காய்ச்சல் மருந்தாம் pic.twitter.com/3StltuzStU
— Subathra Devi (@SubathraDevi_) January 18, 2025
द्रमुकने कामकोटी यांच्या वक्तव्यावर टीका केली. कामकोटी यांचे हे विधान सत्याच्या विरुद्ध आणि लज्जास्पद असल्याचे म्हटले. द्रमुक नेते टीकेएस एलांगोवन म्हणाले, थंथाई पेरियार हे द्रविडर कळघमचे नेते आहेत. केंद्र सरकारचा हेतू देशातील शिक्षण बिघडवण्याचा आहे. रामकृष्णन म्हणाले की, कामकोटी यांनी त्यांच्या दाव्यासाठी पुरावे द्यावेत अन्यथा माफी मागावी. जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही त्यांच्याविरुद्ध निषेध करू, असेही ते म्हणाले. काँग्रेस नेते कार्ती पी. चिदंबरम यांनी कामकोटी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि आयआयटी मद्राससारख्या संस्थेच्या संचालकांनी अशा गोष्टींची जाहिरात करणे अयोग्य असल्याचे म्हटले. गोमूत्र सेवन केल्याने बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो हे वैज्ञानिक सत्य आहे, अशी प्रतिक्रिया 'डॉक्टर्स असोसिएशन फॉर सोशल इक्वॅलिटी'चे डॉ. जी.आर. रवींद्रनाथ यांनी दिली. केंद्रातील भाजप सरकार अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत आहे, असेही ते पुढे म्हणाले.