नवी दिल्ली : न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा ठोठावल्यावर बाबा राम रहीमची रवानगी थेट तुरूंगातच झाली. तुरूंगातील प्रत्येक रात्र त्याच्यासाठी वैऱ्याची ठरत आहे. आजवर अय्याशी आणि व्हीआयपी जीवन जगलेला हा बाबा आता रात्रभर तळमळत आणि रडत आहे. कायद्यासमोर सर्व सारखेच याचे हे उत्तम आणि तितकेच नमुनेदार उदाहरण आहे.
जेलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण अनेकांसाठी परमेश्वर आहोत अशा गुर्मीत असलेला हा बाबा रात्रभर खऱ्याखुऱ्या परमेश्वराला आठवताना दिसतोय. त्याच्यासोबत असलेल्या इतर कैद्यांना आणि तिथल्या अधिकाऱ्यांना त्याचा एकच सवाल आहे की, मी काय केलंय?
शाही आणि तितकेच रंगीन आयुष्य जगलेल्या, असंख्य भक्तांच्या गराड्यात राहिलेल्या या बाबासोबत केवळ दोनच कैदी आहेत. त्यामुळे आजवर लाखोंच्या जमावासमोर आपले ज्ञान पाजळणाऱ्या बाबाचे गाऱ्हाणे ऐकायला श्रोतेच नसतात. बाबा इतका अस्वस्थ झाला आहे की, त्याने तुरूंगात गेल्यापासून काही खाल्ले नाही की, प्यायले नाही. जगातील उंची आणि आरामदायी बेडवर झोपलेल्या या बाबाला तुरूंग प्रशासनाकडून केवळ एक चटई आणि दोन ब्लॅन्केट देण्यात आली आहेत.
वास्तव जीवनात स्वप्नवत आयुष्य जगणारा बाबा राम रहीम तुरूंगात अत्यंत साध्या पेहरावात दिसतो. राम रहीम पहिल्यांदा जेव्हा तुरूगांत आला तेव्हा तो कुर्ता-सलवार या वेशात होता. मात्र, तुरूंगात एण्ट्री होताच तो आता गडद रगाची कॅप्री आणि हलक्या रंगाचा टीशर्ट वापरताना दिसतोय. अधिकारी जेव्हा त्याला चहापाण्याबाबत विचारतात तेव्हा तो एकदम मौनात जातो. त्याला अधिक काही विचारता तो उलटसुलट उत्तरे देतो. त्याची समजूत काढून त्याला खाऊपीऊ घालावे लागते. आलिशान टॉवरमध्ये राहात असलेला हा बाबा ज्या बराकमध्ये राहतो तेथे, अत्यंत साधे टॉयलेट आहे. जे लोखंडी आणि इंडियन आहे. पाण्यासाठी एक तुटके भांडे ठेवण्यात आले आहे. आंघोळ, कपडे आणि इतर सुविधा इतर कैद्यांप्रमाणेच त्याला मिळाल्या आहेत.