कोलकाता : तीन तलाक विरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या याचिकाकर्त्या इशरत जहाँनं आता आपली दोन मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय.
पश्चिम बंगालची रहिवासी असलेल्या इशरतनं गुरुवारी हावडाच्या गोलाबारी पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदवली. उल्लेखनीय म्हणजे, तीन तलाकवर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर इशरतनं सासरच्यांकडून आणि शेजाऱ्यांकडून धमकीचे फोन येत असल्याचंही म्हटलं होतं. इशरत सध्या हावडाच्या पिलखाना भागात आपल्या चार मुलांना घेऊन आपल्या पतीच्या मोठ्या भावाच्या कुटुंबासोबत राहतेय.
WB: #TripleTalaq victim Ishrat Jahan's two children go missing, she has reached Golabari Police Station in Howrah to register complaint
— ANI (@ANI) August 31, 2017
तीन तलाक असंवैधानिक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. या निर्णयाचं समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून मोठ्या प्रमाणात स्वागतच झालं. परंतु, काही कट्टरपंथीयांकडून मात्र या निर्णयाला धर्मात हस्तक्षेप असल्याचं म्हटलं होतं. तसंच या ऐतिहासिक निर्णयानंतर आपल्याला सामाजिक बहिष्काराचाही सामना करावा लागत असल्याची प्रतिक्रियाही इशरतनं व्यक्त केली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं बहुमतानं हा निर्णय दिला होता. तीन तलाकविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्या पाच प्रमुख महिलांपैंकी इशरत एक आहे.