नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला अयोध्येला जाण्याची शक्यता आहे. श्री राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी ते अयोध्येला जाऊ शकतात. याआधी अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत भूमीपूजनाची तारीख कोणती असावी यावर चर्चा झाली.
३ ऑगस्ट आणि ५ ऑगस्टच्या तारखा रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) पाठवल्याचीही माहिती आहे. तथापि, पंतप्रधान 5 ऑगस्टला अयोध्या दौर्यावर येऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे भूमीपूजनाचा कार्यक्रम या दिवशी होणे अपेक्षित आहे.
५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ पासून कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते. पंतप्रधान मोदी त्याच दिवशी 11 ते 1 या दरम्यान अयोध्येत पोहोचू शकतात. पीएमओमधील सूत्रांचे म्हणणे आहे की त्याची संपूर्ण योजना जवळजवळ तयार झाली आहे.
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर चर्चा करण्याबरोबरच मंदिराचा नकाशा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. ट्रस्टने ठरविले की मंदिरात 3 ऐवजी 5 घुमट असतील. प्रस्तावित नकाशापेक्षा मंदिराची उंची देखील जास्त असेल. बैठकीनंतर ट्रस्टचे सरचिटणीस चम्पत राय यांनी माध्यमांना सांगितले की, कोरोनाची परिस्थिती हाताळल्यानंतर हा निधी गोळा केला जाईल. श्री राम यांचे भव्य आणि दिव्य मंदिर तीन ते साडेतीन वर्षांत तयार होईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.