राम मंदिरासाठी या राज्यातून 515 कोटी रुपये जमा, आतापर्यंत इतका निधी जमा?

राजस्थानच्या जनतेने राममंदिराच्या (Ram Mandir) निर्मितीसाठी सर्वाधिक रक्कम दिली आहे.  

Updated: Mar 8, 2021, 09:35 AM IST
राम मंदिरासाठी या राज्यातून 515 कोटी रुपये जमा, आतापर्यंत इतका निधी जमा?  title=

जयपूर : राजस्थानच्या जनतेने राममंदिराच्या (Ram Mandir) निर्मितीसाठी सर्वाधिक रक्कम दिली आहे. विश्व हिंदू परिषदचे (VHP) केंद्रीय उपाध्यक्ष आणि श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय जैन (Champat Rai Jain) यांनी सांगितले की, श्री राम मंदिर बांधण्यासाठी राजस्थानकडून (Rajasthan) सर्वाधिक 515 कोटी रुपये अयोध्येतील राम मंदिरासाठी (Ram Mandir) देणगी मिळाली आहे. हे पैसे राज्यातील 36 हजार गाव आणि शहरांतून जमा झाले आहेत. (Rajasthan collected highest fund of RS 515 crore - Champat Rai Jain)

42 दिवस देणगी मोहीम सुरु होती 

राय म्हणाले की, देशातील मकर संक्रांत (15January) ते माघी पौर्णिमेपर्यंत  (27 February )42 दिवस चाललेल्या मोहिमेमध्ये सुमारे 9 लाख कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन देणगी जमा केली. 4 मार्चपर्यंत मंदिर बांधण्यासाठी 2500 कोटी रुपये जमा झाले आहेत. तथापि, अद्याप शेवटचा आकडा येणे बाकी आहे. त्यांनी सांगितले की या जमिनीवर जवळपास 500 विशाल वृक्ष आहेत, त्यांना कोणताही धोका न पोहोचवता आणि न कापता दुसर्‍या ठिकाणी हलविण्यात येईल.

राम मंदिर तीन मजली असणार

राम मंदिराच्या बांधकामाविषयी माहिती देताना राय म्हणाले की, मंदिराच्या पायाभरणीसाठी मिर्जापूरचा दगड बसविण्याचा विचार केला जात आहे. त्याचबरोबर भरतपूर जिल्ह्यातील बंशी पहाडपूरचा दगड मंदिर उभारणीसाठी वापरण्यात येणार आहे. राम मंदिरात तीन मजले असेल आणि प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट असेल. येथे एकूण 160 खांब उभारले जाणार आहेत. सुमारे अडीच एकरात फक्त एक मंदिर बांधले जाईल. तर चारही एकरांवर व्हरांडा बनविला जाईल. हे काम तीन वर्षांत पूर्ण होईल.

देणगी गोळा करण्याची मोहीम बंद

राम मंदिरासाठी 4 मार्चपर्यंत अडीच हजार कोटींची देणगी जमा झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली होती. अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची उभारणी करण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून जोरदार काम सुरु आहे. या राम मंदिराच्या उभारणीसाठी देशातील जनतेकडून देणगी देखील स्वीकारल्या जात होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर आता अशा प्रकारे घरोघरी जाऊन मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम बंद करण्यात आल्याचे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  

तीन वर्षांत मंदिर उभे राहणार

तीन वर्षांत राम मंदिर अयोध्येत उभे राहणार आहे, अशी माहिती राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात एएनआयशी बोलताना माहिती दिली. ते म्हणाले, राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करण्याची मोहीम आता बंद करण्यात आली आहे. लोकांना जर देणगी द्यायची असेल, तर त्यांनी ती ऑनलाई पद्धतीने द्यावी. त्यासाठी ट्रस्टच्या वेबसाईटवर ते जाऊ शकतात. मंदिराच्या समोरच्या बाजूची जमीन अधिग्रहित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीची बोलणी देखील सुरू आहेत. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.