नवी दिल्ली : आपल्या खास डोळ्यांची झलक दाखवत प्रिया प्रकाशने पाहता पाहता अनेकांचा कलेजा खलास केला. पण, तिच्या डोळ्यांच्या याच अदांवर वादाचे मोहोळ उठले. तिच्या चित्रपटातून मुस्लिमांच्या भावना दुखावल्याचा आरोप झाला. या आरोपाविरूद्ध प्रियाच्या बाजूने भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) उभा राहिला असून, भाकपच्या पोस्टरवही प्रियाचे पोस्टर झळकल्याचे वृत्त आहे.
इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भाकपची विद्यार्थी शाखा प्रियाच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. केरळ येथील मलप्पुरम येथे पक्षाच्या पोस्टरवर प्रियाचा डोळा मारतानाचा फोटो छापून तिला पाठिंबाही व्यक्त केला आहे. 'ओरू आदर लव्ह' या चित्रपटातून प्रिया प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात मुस्लिमांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, भाकपच्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटना (एआयएसएफ) ने पक्षाच्या अधिवेशनात प्रिया प्रकाश हिचा डोळा मारतानाचे छायाचित्र असलेले पोस्टर झळकावले. या पोस्टरवर 'ओरू आदर लव्ह'ची छाप दिसते. हे पोस्टर सध्या समाजमाध्यमांमध्ये (सोशल मीडिया) जोरदार व्हायरल होत आहे. भाकपचे राज्यस्थिरीय अधिवेशन गुरूवारी (१ मार्च) सुरू झाले होते. मात्र, हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी हे पोस्टर झळकत असल्याचे 'टीओआ'यच्या वृत्तात म्हटले आहे.