रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : (Loksabha Election Results 2024) लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि एडीएला 300 जागांचा आकडाही ओलांडता आला नाही ही वस्तूस्थिती. उलटपक्षी ज्या (INDIA Alliance) इंडिया आघाडीवर संपूर्ण प्रचारादरम्यान एनडीए नेत्यांनी चौफेर टीका केली, त्याच इंडिया आघाडीला 234 जागा मिळवत्या आल्याचंच देशभरातून अधिक कौतुक झालं. महाराष्ट्रातही महायुतीला अपयशाचा सामना करावा लागला. निकालाच्या दिवशी राज्यात (Shivsena UBT) शिवसेनेच्या ठाकरे गटासह मविआच्या नेत्यांचा जल्लोष सुरु असतानाच (BJP) भाजप कार्यालयं आणि शाखांमध्ये मात्र शुकशुकाट होता.
राज्यातील या राजकीय चर्चांना वेगळं वळण तेव्हा मिळालं जेव्हा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत 'मला सरकारमधून मोकळं करा', असं वक्तव्य केलं. इथं फडणवीसांनी दिलेल्या संकेतांचा नेमका अर्थ लावण्यात अनेकजण व्यग्र असतानाच तिथं गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचं नेतृत्त्वं असणाऱ्या (Amit Shah) अमित शाह आणि फडणवीस यांची भेट जाली. (Devendra Fadnavis Meets Amit Shah)
फडणवीस आणि शाह यांच्या भेटीमध्ये झालेल्या चर्चांनंतर राज्यात काही संघटनात्मक बदल केले जाणार असल्याची चिन्हं स्पष्ट असल्याची माहिती सूत्रांनी दिली. असं असलं तरीही प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरच जबाबदारी कायम राहणार असल्याचं सांगण्यात येत असून, राज्यात भाजप पुन्हा जोरदार काम करमार असल्याची हमी यावेळी देण्यात आली. दरम्यान, 'राजीनामा नाराजीतून नाही तर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आहे, त्यामुळं जबाबदारीतून मोकळं करा' अशी विनंतीपर मागणी फडणवीसांनी शाहांकडे केल्याचं म्हटलं जात आहे.
आपला निर्णय भावनिक नसून प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून घेण्यात आल्याचं फडणवीसांनी अमित शाह यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्रीपदाच्या कामातून मुक्त करावं आणि पक्षाच्या, संघटनेच्या कासाठी आपण अधिक काम करू इच्छित असल्याचं त्यांनी शाह यांना सांगण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर अमित शाह यांनीसुद्धा सदर परिस्थितीवरून फडणवीसांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, या भेटीत नेमका अंतिम निर्णय कोणता झाला हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. त्यामुळं आता फडणवीसांच्या निर्णयाकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.