ज्योतिरादित्य सिंधियांनी ट्विटवरून 'भाजप'ला हटवले; तर्कवितर्कांना उधाण

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांचे केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा होती. 

Updated: Jun 6, 2020, 10:16 AM IST
ज्योतिरादित्य सिंधियांनी ट्विटवरून 'भाजप'ला हटवले; तर्कवितर्कांना उधाण title=

भोपाळ: काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या गोटात दाखल झालेले ज्योतिरादित्य सिंधिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या बायोमध्ये भाजपचा उल्लेख काढून टाकल्याचे समजते. त्यामुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात पुन्हा एकदा रंगत येण्याची शक्यता आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आता ट्विटरमधील बायोत स्वत:चा उल्लेख जनतेचा सेवक आणि क्रिकेटप्रेमी असा करायला सुरुवात केली आहे. यानंतर गदारोळ निर्माण झाल्यानंतरही सिंधिया यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात नवे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

राज्यसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांचे केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा होती. मात्र, कोरोनामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबवणीवर पडला आहे. अशातच मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या समर्थकांना भाजपकडून उमेदवारी मिळण्यात अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सिंधिया यांच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आता ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपवर दबाव टाकायला सुरुवात केल्याचे समजते. 

तर दुसरीकडे भाजपने मात्र पोटनिवडणुकीत सिंधिया यांच्या २२ समर्थकांना तिकीट दिल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सिंधिया समर्थकांच्या विजयाची वाट अवघड मानली जात आहे. या सगळ्या घटनाक्रमावर सिंधिया समर्थकांकडून जाहीर भाष्य केले जात नसले तरी दबक्या आवाजात बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरु आहेत. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडून भाजपवर दबाव टाकला जात आहे. सिंधिया यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यापूर्वीही अशाचप्रकारे ट्विटरवरून पक्षाचा उल्लेख हटवला होता.