Opinion Poll: पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचं कारण काय? 41 टक्के लोकांनी सांगितलं 'हे' एकमेव कारण

LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएकडून पंतप्रधानपदासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचा चेहरा असून, विरोधकांसमोर मोठं आव्हान आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास ते सलग तिसऱ्यांदा प्रमुखपदी विराजमान होतील.   

शिवराज यादव | Updated: Mar 15, 2024, 07:29 PM IST
Opinion Poll: पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचं कारण काय? 41 टक्के लोकांनी सांगितलं 'हे' एकमेव कारण  title=

LokSabha: लोकसभा निवडणुकीत विरोधकांसमोर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान असणार आहे. एनडीएकडून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचीच निवड केली असल्याने विरोधकांना जोरदार प्रचार करावा लागणार आहे. नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्या प्रसिद्धीत प्रचंड वाढ झाली आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडे नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकणारा एकही चेहरा नाही. 

LokSabha: अयोध्या राम मंदिराचा भाजपाला किती फायदा होईल? लोकांनी 'या' पर्यायाला दिली भरभरुन मतं

दरम्यान Zee News आणि MATRIZE ने ओपिनियन पोल घेतला यामध्ये नरेंद्र मोदींच्या प्रसिद्धीचं नेमकं कारण काय असं विचारण्यात आलं. यावर 41 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेसाठी कल्याणकारी योजना कारणीभूत असल्याचं सांगितलं आहे. तर 18 टक्के लोकांनी हिंदुत्त्व (राम मंदिर) असं उत्तर दिलं आहे. तसंच 12 टक्के लोकांनी राष्ट्रवाद, 22 टक्के लोकांनी भ्रष्टाचार मुक्त सरकार कारणीभूत असल्याचं उत्तर दिलं आहे. तर 7 टक्के लोकांनी इतर कारणं असल्याची माहिती दिली आहे.

कोणता विरोधी नेता मोदींसमोर तगडं आव्हान उभं करु शकेल? 

लोकसभेच्या आज निवडणुका झाल्यास कोणता विरोधी नेता मोदींसमोर तगडं आव्हान उभं करु शकेल? असं विचारण्यात आलं असता राहुल गांधींना सर्वाधिक पसंती देण्यात आली. पण राहुल गांधींना फक्त 23 टक्के मतं मिळाली आहेत. यानंतर ममता बॅनर्जी यांचा क्रमांक आहे. त्यांना 11 टक्के मतं मिळाली आहे. यानंतर प्रियांका गांधी आणि अरविंद केजरीवाल आहेत. त्यांना अनुक्रमे 11 आणि 8 टक्केच मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे अन्यला 44 टक्के मतं आहेत.

मोदींच्या 10 वर्षांच्या कामगिरीबाबत मत काय?   

पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षांच्या कामगिरीबाबत विचारण्यात आलं असता 46 टक्के लोकांनी खूप चांगली तर 28 टक्के लोकांनी काहीशी चांगली असल्याचं सांगितलं आहे.  22 टक्के लोकांनी मात्र कामगिरी वाईट असल्याचं म्हटलं आहे. 

राम मंदिराच्या मुद्द्याचा भाजपाला निवडणुकीत किती फायदा होईल?

दरम्यान राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुद्द्याचा भाजपला निवडणुकीत किती फायदा होईल असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तब्बल 56 टक्के लोकांनी भाजपाला खूप जास्त फायदा होईल असं मत मांडलं आहे. तर 26 टक्के लोकांच्या मते फक्त काही प्रमाणात फायदा होईल असं म्हटलं आहे. तसंच 9 टक्के लोकांनी काही फरक पडणार नाही असं मत मांडलं असून, 5 टक्के लोकांनी नुकसान होईल असा अंदाज वर्तवला आहे. तर 4 टक्के लोकांनी काहीही मत नोंदवलेलं नाही. 

DISCLAIMER: लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर होऊ शकतात. यापूर्वी, MATRIZE ने ZEE NEWS साठी ओपिनियन पोल घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीनगर दौऱ्यानंतर आणि देशभरात CAA लागू झाल्यानंतर हे जनमत सर्वेक्षण घेण्यात आले. 27 फेब्रुवारी ते 13 मार्च दरम्यान हे ओपिनियन पोल घेण्यात आले. या ओपिनियन पोलमध्ये लोकसभेच्या 543 जागांवर एक लाख 13 हजार 843 लोकांची मते घेण्यात आली आहेत. यामध्ये 61 हजार 4075 पुरुष आणि 37 हजार 568 महिलांचा समावेश आहे. याशिवाय पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या 14 हजार 799 जणांचाही समावेश करण्यात आला आहे. ओपिनियन पोलच्या निकालांमध्ये एक ते दोन टक्क्यांचा फरक पडू शकतो. हे निवडणुकीचे निकाल नाहीत, हा फक्त ओपिनियन पोल आहे. हा ओपिनियन पोल म्हणजे कोणत्याही प्रकारे निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न नाही.