LokSabha: अयोध्या राम मंदिराचा भाजपाला किती फायदा होईल? लोकांनी 'या' पर्यायाला दिली भरभरुन मतं

LokSabha: लोकसभा निवडणुकीत अयोध्या राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा असेल. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित राहिलेलं मंदिर अखेर उभं राहिलं आहे. पण भाजपाला याचा फायदा होईल की तोटा हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 15, 2024, 06:34 PM IST
LokSabha: अयोध्या राम मंदिराचा भाजपाला किती फायदा होईल? लोकांनी 'या' पर्यायाला दिली भरभरुन मतं title=

LokSabha: लोकसभा निवडणुकीच्या तारखांची उद्या घोषणा होणार असून, आता प्रचाराचा धुरळा उडताना दिसेल. या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातील. दरम्यान यावेळी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न केला जाईल. यामध्ये अयोध्या राम मंदिराचा मुद्दाही कळीचा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला होता. काँग्रेसने मात्र या सोहळ्याला गैरहजेरी लावून आपला निषेध नोंदवला होता. 

Zee News आणि MATRIZE ने ओपिनियन पोल घेतला असून यामध्ये राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुद्द्याचा भाजपला निवडणुकीत किती फायदा होईल असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तब्बल 56 टक्के लोकांनी भाजपाला खूप जास्त फायदा होईल असं मत मांडलं आहे. तर 26 टक्के लोकांच्या मते फक्त काही प्रमाणात फायदा होईल असं म्हटलं आहे. तसंच 9 टक्के लोकांनी काही फरक पडणार नाही असं मत मांडलं असून, 5 टक्के लोकांनी नुकसान होईल असा अंदाज वर्तवला आहे. तर 4 टक्के लोकांनी काहीही मत नोंदवलेलं नाही. 

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित न राहण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाबाबत तुमचं मत काय? असं विचारण्यात आलं असता 19 टक्के लोकांनी योग्य तर तब्बल 71 टक्के लोकांनी चुकीचा असं उत्तर दिलं आहे. थोडक्यात अयोध्य राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाणं काँग्रेसला महागात पडू शकतं. 

मोदींच्या 10 वर्षांच्या कामगिरीबाबत मत काय?   

पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षांच्या कामगिरीबाबत विचारण्यात आलं असता 46 टक्के लोकांनी खूप चांगली तर 28 टक्के लोकांनी काहीशी चांगली असल्याचं सांगितलं आहे.  22 टक्के लोकांनी मात्र कामगिरी वाईट असल्याचं म्हटलं आहे. 

 

पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचं कारण काय?  

पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेसाठी कल्याणकारी योजना कारणीभूत असल्याचं मत 41 टक्के लोकांनी मांडलं आहे. तर 18 टक्के लोकांनी हिंदुत्त्व (राम मंदिर) असं उत्तर दिलं आहे. तसंच 12 टक्के लोकांनी राष्ट्रवाद, 22 टक्के लोकांनी भ्रष्टाचार मुक्त सरकार कारणीभूत असल्याचं उत्तर दिलं आहे. तर 7 टक्के लोकांनी इतर कारणं असल्याची माहिती दिली आहे.

 

कोणत्या मुद्द्यांवर तुमच्या मतदानाचा सर्वाधिक परिणाम?   

लोकसभेची निवडणूक आज झाल्यास खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांवर तुमच्या मतदानाचा सर्वाधिक परिणाम असेल असं विचारलं असताना 56 टक्के लोकांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार, 17 टक्के लोकांनी केंद्र सरकारच्या विकास योजना, 4 टक्के लोकांनी, 8 टक्के लोकांनी रोजगार आणि बेरोजगारी, आणि 7 टक्के लोकांनी खासदारांचं कार्य असं उत्तर दिलं. 

 

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी घेतलेल्या निर्णयांशी किती समाधानी?  

मोदी सरकारने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी घेतलेल्या निर्णयांशी तुम्ही किती समाधानी आहात असा प्रश्नही विचारण्यात आला. यावर 32 टक्के लोकांनी खूप जास्त, 40 टक्के लोकांनी काही प्रमाणात तर 24 टक्के लोकांनी असमाधानी असल्याचं सांगितलं. 

 

CAA कायद्याचा सर्वात अधिक फायदा कुणाला?  

नागरिकत्व सुधारणा विधेयक कायद्याचा सर्वाधिक फायदा भाजपाला होईल असं मत लोकांनी मांडलं आहे. 46 टक्के लोकांनी भाजपा तर 21 टक्के लोकांनी विरोधी पक्षाला फायदा होईल असं म्हटलं आहे. तर 25 टक्के लोकांनी कोणालाच फायदा होणार नाही असं म्हटलं आहे. 

 

DISCLAIMER: लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर होऊ शकतात. यापूर्वी, MATRIZE ने ZEE NEWS साठी ओपिनियन पोल घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीनगर दौऱ्यानंतर आणि देशभरात CAA लागू झाल्यानंतर हे जनमत सर्वेक्षण घेण्यात आले. 27 फेब्रुवारी ते 13 मार्च दरम्यान हे ओपिनियन पोल घेण्यात आले. या ओपिनियन पोलमध्ये लोकसभेच्या 543 जागांवर एक लाख 13 हजार 843 लोकांची मते घेण्यात आली आहेत. यामध्ये 61 हजार 4075 पुरुष आणि 37 हजार 568 महिलांचा समावेश आहे. याशिवाय पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या 14 हजार 799 जणांचाही समावेश करण्यात आला आहे. ओपिनियन पोलच्या निकालांमध्ये एक ते दोन टक्क्यांचा फरक पडू शकतो. हे निवडणुकीचे निकाल नाहीत, हा फक्त ओपिनियन पोल आहे. हा ओपिनियन पोल म्हणजे कोणत्याही प्रकारे निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न नाही.