नवी दिल्ली : Letter hate against muslims in india to PM Modi : मुस्लिमांना देशात लक्ष्य केले जात आहे, असा आरोप करत 100 हून अधिक माजी सनदी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. भाजपशासित राज्यात मुस्लिमांविरोधात हिंसा वाढलीय असून पंतप्रधान मोदी मौन बाळगून का आहेत, असा सवाल विचारला आहे. तसेच पत्रावर नजीब जंग, शिवशंकर मेनन, सुजाता सिंग आणि मीरा बोरवणकर यांच्यासह अनेकांनी सही केली आहे.
मंगळवारी माजी सनदी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या तीन पानी पत्रामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पत्रामध्ये देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य करताना नाईलाजाने अशा पद्धतीने संताप व्यक्त करावा लागत आहे, असे नमूद केले आहे. देशात सध्या मुस्लिमांनाबद्दल द्वेषाची भावना वाढीस लागली आहे. सामान्यपणे माजी प्रशासकीय अधिकारी म्हणून अशा पद्धतीने टोकाला जाऊन आमच्या भावना व्यक्त करणे ही काही आमची इच्छा नसते. पण ज्या वेगाने आपल्या संविधानकर्त्यांनी तयार केलेली देशाची घटनात्मक चौकट उद्ध्वस्त केली जात आहे, ते पाहाता आम्हाला नाईलाजाने आमचा संताप आणि वेदना अशा पद्धतीने व्यक्त कराव्या लागत आहेत, असे पत्रात म्हटले आहे.
भाजपाशासित राज्यांत याचा प्रत्यय येत आहे. या पत्रामध्ये भाजपाशासित राज्यांमध्ये अल्पसंख्याक समाजाची हेटाळणी होत असल्याचे नमूद केलं आहे. आसाम, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये अल्पसंख्याक समाजाविरुद्ध द्वेष आणि हिंसाचार वाढू लागला आहे. विशेषत: मुस्लीम समाजाचा यात प्रामुख्याने समावेश आहे. या घटनांनी आता भयानक वळण घ्यायला सुरुवात केली आहे, असे मोदींना लिहिल्या पत्रामध्ये म्हटले आहे.