Crime News : कर्नाटकातील (Karnataka Crime) एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची सोशल मीडियाचा (Social Media) अतिवापर केल्यामुळे हत्या केली आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे पती पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. त्यानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या करत तिचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिला होता. मात्र त्यानंतर पतीने स्वतः पोलीस ठाण्यात (Karnataka Police) जात पत्नीच्या हत्येची कबुली दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कृत्यामध्ये मृत महिलेच्या सासऱ्यानेही पतीला साथ दिली होती. पोलिसांनी आरोपीसह त्याच्या कुटुंबाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु केला आहे.
रागाच्या भरात गळा आवळून केला खून
कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील कोप्पुल गावात हा सगळा प्रकार घडला आहे. हत्या झालेल्या महिलेला सोशल मीडियावर रील आणि शॉर्ट्सचे व्हिडिओ अपलोड करण्याची खूप आवड होती. तिचा दिवसभरातील बराच वेळ फोनवर जात होता. पत्नीची ही गोष्ट पतीला अजिबात आवडत नव्हती. याच कारणावरून त्यांच्यात अनेकदा भांडण देखील होत होती. 7 ऑगस्ट रोजी दोघांमध्ये याच कारणावरुन जोरदार भांडण झाले. मात्र रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह अन्य एकाला अटक केली आहे.
मोबाईल वापरणं ठरलं मृत्यूचं कारण
मृत पूजा आणि आरोपी पती श्रीनाथ यांचे नऊ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. सोशल मीडियामुळे पूजाला रील्स आणि शॉर्ट्सचे व्हिडिओ बनवण्याची आवड निर्माण झाली होती. गेल्या काही वर्षांपासून तिचा बराचसा वेळ फक्त मोबाईलवरच जाऊ लागला होता. यावरून पूजा आणि श्रीनाथमध्ये भांडणे सुरू झाली. पूजा आणि श्रीनाथ यांच्यात मोबाईल वापरावरून भांडण वाढू लागले होते. श्रीनाथला पत्नी पूजाचे रील बनवणे अजिबात आवडत नव्हते. तसेच पूजाचे कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचाही त्याला संशय होता.
दगडाला बांधून नदीत फेकला मृतदेह
7 ऑगस्ट रोजीही याच मुद्द्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या श्रीनाथने पूजाचा गळा आवळून तिची हत्या केली. पूजाची हत्या केल्यानंतर श्रीनाथने सासरा शेखरला गाठून संपूर्ण हकीकत सांगितली. पोलिसांना घटनेची माहिती देण्याऐवजी सासरच्यांनी श्रीनाथला साथ दिली आणि दोघांनी मिळून पूजाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. श्रीनाथ आणि शेखर यांनी पूजाचा मृतदेह बाईकवर नेऊन जवळच्या नदीत दगड बांधून फेकून दिला. हत्येनंतर काही दिवस श्रीनाथ निमिशांबा मंदिरात देखील गेला होता.
मात्र पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर श्रीनाथला पश्चाताप होऊ लागला. त्याने आपली चूक कबूल करण्याचा निर्णय घेतला आणि अरकेरे पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. त्याने पूजाची हत्या कशी केली तसेच हत्येमागचे कारण सुद्धा सांगितले. पोलिसांनी त्यानंतर श्रीनाथला अटक केली असून पूजाच्या मृतदेहाचा शोध सुरु केला आहे.