कर्नाटक हादरलं! घरात घुसून आईसह तीन मुलांची निर्घृण हत्या, सासूवर केले वार

Karnataka Crime : कर्नाटकात एकाच घरातील चौघांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आईसह तिच्या तीन मुलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोराने घरात घुसून चौघांना चाकूने भोकसलं आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 13, 2023, 09:31 AM IST
कर्नाटक हादरलं! घरात घुसून आईसह तीन मुलांची निर्घृण हत्या, सासूवर केले वार title=
(फोटो सौजन्य - PTI)

Crime News : कर्नाटकातून (Karnataka Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात रविवारी अज्ञात हल्लेखोराने एकाच कुटुंबातील चार जणांची चाकूने भोसकून हत्या केली. या हत्येमुळं कर्नाटकात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Karnataka Police) घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. एका महिलेची आणि तिच्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. या हल्ल्यात आणखी एक महिला जखमी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उडुपी जिल्ह्यातील केमन्नू भागात एका महिलेसह तिच्या तीन मुलांची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली आहे. माक्स घातलेल्या व्यक्तीने जबरदस्तीने घरात घुसून हसीना नावाची महिला आणि तिच्या तीन मुलांवर हल्ला केला. या हल्ल्यात आणखी एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हसीना 46 वर्षांच्या होत्या आणि त्यांची मुले अनुक्रमे 23, 21 आणि 12 वर्षांची होती.

हसीना यांच्यावर हल्ला झाल्यानंतर घरातील गोंधळ ऐकून शेजारी बाहेर आले होते. मात्र त्यावेळी आरोपीने त्यांनाही शस्त्राचा धाक दाखवून  धमकावले. या हल्ल्यात महिलेच्या सासूलाही जखमा झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. "नेझर गावाजवळ चार जणांची हत्या करण्यात आली आहे. हसीना आणि तिच्या तीन मुलांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे," असे उडुपीच्या पोलीस अधीक्षकांनी म्हटलं.

'सुरुवातीच्या तपासात हत्येमागे वैयक्तिक भांडण असल्याचे दिसून येत आहे. पण याची पुष्टी करण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू गहाळ झाली नाही. त्यामुळे दरोड्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी ही हत्या झालेली असू शकते. आम्ही हल्लेखोराचे हसीना किंवा त्यांच्या मुलांशी काही भांडण आहे का ते पाहत आहोत,'  अशीही माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, माध्यमांच्या वृत्तानुसार, मृत महिलेचा पती आखाती देशात काम करतो. उडपी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरुण कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. हत्येमागील हेतू अद्याप समजू शकलेला नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र या हत्येमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. स्थानिक लोक घाबरले आहेत.

नंदुरबारमध्ये किरकोळ कारणातून तरुणाची हत्या

नंदुरबार शहरातील अमृत चौकाजवळ किरकोळ कारणातून तरुणाची हत्या करण्यात आल्याने शहरात एकच खडबड उडाली आहे. ऐन दिवाळी सणामध्ये या खुनाच्या घटनेमुळे शहरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. नंदुरबार शहरातील अमृत चौकाजवळ दोघं युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर एकाने चाकूचा वार करत एकाची हत्या केल्याची घटना घडली. शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमृत चौक परिसरात योगेश चौधरी आणि त्यांचे मित्र जात असताना हा वाद झाल्याची चर्चा आहे. चाकूने केलेले घाव वर्मी लागल्याने योगेश चौधरी या तरुणाच्या जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात नंदुरबार पोलीस दाखल झाले असून, परिसरात शांतता असून आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाले आहेत. या परिसरामध्ये पोलिसांनी चोक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.