बायकोशी भांडताना नवरा झाला 'हैवान'; डोळ्यांवर आणि गालावर घेतला चावा, शेवटी हेल्मेटने...

Karnataka Crime : कर्नाटकात एका माथेफिरु पतीने दारुसाठी पैसे नाही दिले म्हणून पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

आकाश नेटके | Updated: Dec 20, 2023, 12:27 PM IST
बायकोशी भांडताना नवरा झाला 'हैवान'; डोळ्यांवर आणि गालावर घेतला चावा, शेवटी हेल्मेटने...  title=

Karnataka Crime : कर्नाटकातून घरगुती हिंसाचाराची एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटकात दारूच्या नशेत एका व्यक्तीने पत्नीवर हल्ला करून तिच्या डोळ्यांचा चावा घेतला. आरोपीने पत्नीच्या गालाचाही चावा घेतला. तसेच पतीने पत्नीवर हेल्मेटनेही हल्ला केला. कोणत्या तरी वादातून दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर आरोपी पतीने हे धक्कादायक कृत्य केलं आहे. पीडित पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री घडली. हे दाम्पत्य बेलथनगडी परिसरात राहत होते. दारू पिऊन एका महिलेला तिच्या पतीने बेदम मारहाण केली, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. दारूच्या नशेत आरोपीने पत्नीवर हेल्मेटने हल्ला करून तिच्या डोळ्याचा आणि गालाचा चावा घेतला. ही घटना  जखमी महिला आणि तिच्या मुलीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुरेश असे आरोपीचे नाव असल्याचे समोर आलं आहे. सुरेश आणि त्याच्या पत्नीमध्ये काही वाद झाला. त्यानंतर त्याने पत्नीवर हल्ला करण्यास सुरुवात केली. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रश्यंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 55 वर्षीय सुरेशने त्याच्या पत्नीवर हाताने आणि हेल्मेटने हल्ला केला आणि तिच्या चेहऱ्यावर चावा घेतला, त्यामुळे बराच रक्तस्त्राव झाला.

पीडित पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्या दोन्ही डोळ्यांना दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरेशची मुलगी आईला वाचवण्यासाठी पुढे आली असता त्याने तिलाही मारहाण केली. त्यानंतर घाबरलेली मुलगी घरातून पळून गेली. मंगळवारी ही महिला बेशुद्धावस्थेत आढळून आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. महिला आणि तिच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांवर उपचार सुरू आहेत.

 पोलिसांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध भादंवि कलम 326, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजाऱ्यांनी सांगितले की, 'सुरेश अनेकदा दारूच्या नशेत यायचा आणि नंतर पत्नीशी जोरदार भांडण करायचा. सुरेश त्याच्या पत्नीकडे दारू पिण्यासाठी वारंवार पैसे मागायचा. यावरून दररोज वाद, मारामारी होत होती. त्या दिवशीही याच मुद्द्यावरून वाद झाला होता.'