मुंबई : गेल्या वर्षी भारतात दाखल झालेल्या कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे लोक त्रस्त आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले जीव गमावले. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना संसर्गामुळे टीबीचा धोका वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये सक्रीय टीबीचा धोका वाढू शकतो.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये कोविडविरोधी निर्बंधामुळे टीबीच्या प्रकरणांमध्ये सुमारे 25 टक्के घट झाली आहे. पण आता कोरोना रूग्णांमध्ये टीबीचा धोका वाढत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. दरम्यान टीबीच्या रूग्णांमध्ये अचानक वाढ नोंदवण्यात आली आहे.
दररोज अनेक लोकांना टीबीची समस्या उद्भवत असल्यामुळे डॉक्टर देखील चिंतेत आले आहेत. आता आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविडच्या सर्व रुग्णांसाठी टीबी चाचणी व सर्व क्षयरोगाच्या कोविड चाचणीची शिफारस केली आहे.
मंत्रालयाने सांगितल्यानुसार SARS-COV-2 कोरोना रूग्णामध्ये टीबी होण्याचा धोका वाढू शकतो. परंतू कोरोनामुळे टीबीच्या रूग्णांचा धोका वाढत असल्याचा पुरावा अद्याप समोर आलेला नाही.