इम्रान खानच्या शपथविधीनंतर सिद्धू परतले, पाकिस्तानवर उधळली स्तुतीसुमने

 पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीनंतर नवजोतसिंग सिद्धू भारतात परतले आहेत.

Updated: Aug 19, 2018, 04:11 PM IST
इम्रान खानच्या शपथविधीनंतर सिद्धू परतले, पाकिस्तानवर उधळली स्तुतीसुमने title=

चंडीगड : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीनंतर नवजोतसिंग सिद्धू भारतात परतले आहेत. भारतात परतल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि पंजबा सरकारमधले मंत्री असलेल्या सिद्धूंनी पाकिस्तानवर स्तुतीसुमने उधळली आहेत. सिद्धूंनी पाकिस्तानकडून मिळालेल्या खातिरदारीची प्रशंसा केली आहे. पाकिस्तानमध्ये प्रेम आणि आपलेपण मिळालं. हा एक सकारात्मक उपक्रम आहे. तसंच आयुष्यभर जे मिळालं नाही ते या २ दिवसांमध्ये मिळालं, असंही सिद्धू म्हणाले.

इम्रान खानच्या शपथविधी सोहळ्याला सिद्धूला पाकव्याप्त काश्मीरचे राष्ट्रपती मसूद खान यांच्या बाजूला बसवण्यात आलं. यावरही सिद्धूंना प्रश्न विचारण्यात आला. मी तिकडे पाहुणा होतो. मला जिकडे बसवण्यात आलं तिकडे मी बसलो, असं सिद्धू म्हणाला. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि तिथल्या राष्ट्रपती पदाला किंवा पाकिस्तानकडून देण्यात येणाऱ्या कोणत्याही पदाचा भारत स्वीकार करत नाही.

इम्रान खान पंतप्रधान झाल्यामुळे भारत-पाकिस्तानमधली शांततेची प्रक्रिया आणखी चांगली होईल, असा विश्वास सिद्धूंनी व्यक्त केला. तसंच पाकिस्तानमध्ये आलेल्या बदलाचंही त्यांनी स्वागत केलं आहे. मी भारताचा सद्भावना दूत म्हणून 'मोहब्बत का पैगाम' घेऊन आल्याची प्रतिक्रिया सिद्धूंनी दिली. मी राजकारणी नाही तर इम्रानचा मित्र म्हणून पाकिस्तानला आल्याचं वक्तव्य सिद्धूंनी केलं.

लष्कर प्रमुखाची गळाभेट

सिद्धूंनी पाकिस्तान सेनेचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली होती. यावरूनही भाजपनं सिद्धूंवर आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

Sidhu