नवी दिल्ली: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून एक अत्यंत खळबळजनक तितकीच मानवी अत्याचाराची करूण कहाणी पुढे आली आहे. इथल्या एका सात वर्षीय चिमुकलीवर तिच्या आजोबानेच बलात्कार केला आहे. नराधम आजोबाने चिमुकलीवर बलात्कार करून तिला रोहिणी परिसरातील अनाथाश्रमात सोडले. पीडितेवरील अत्याचाराची कहाणी केवळ तिच्या आजोबापासून सुरू होऊन अनाथालयापर्यंतच संपत नाही. तर, या पीडितेवरील अन्यायाची सुरूवातही अस्वस्थ करणारी आणि तितकीच हादरवून सोडणारी आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडितेच्या आईचे निधन झाले. त्यानंतर एकट्या पडलेल्या पीडितेला जन्मदात्या बापाने तिला तिच्या आजोळी धाडले. सुरूवातीचे काही काळ ती मामाकडे राहू लागली. पण, अल्पावधीतच ती मामा-मामीच्या नजरेला खटकू लागली. त्यामुळे त्यांनी तिला परत आजोबांकडे (वडिलांचे वडील) सुपूर्त केले. आजोबाने तिला सोबत ठेऊन घेतले. पण, थोड्याच दिवसात आजोबांचे पीडितेसोबतचे वर्तन बदलले. त्याच्यातला वासनांध नराधम जागा झाला. आजोबाने नातीला वासनेच्या ढोहात खेचले. पीडितेवर बलात्कार केला. पाशवी वृत्तीच्या आजोबाचे क्रुरकर्म इथेच थांबले नाही. वासनेचा राक्षस शमल्यावर त्याने पीडितेला दिल्लीतील रोहिणी परिसरातील अनाथाश्रमात सोडले. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपी आजोबाला १४ ऑगस्ट या दिवशी ताब्यात घेतले.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी (वय वर्षे ६०) मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. गेली काही वर्षे तो नांगलोई येथील राजधानी पार्क परिसरात राहतो. तो पेशाने कारागीर आहे आणि स्वत:च्या मालकिच्या घरात राहतो. तर, पीडिता आगोदर आपल्य आईवडीलांसोबत रोहिणी परिसरात राहात होती. मात्र, पतीच्या जाचाला कंटाळून पीडितेच्या आईने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली. त्यानंतर पीडितेच्या वडीलांनी तिला तिच्या आजोळी नेऊन सोडले. पण, तिथेही पीडितेवरून मामा-मामीमध्ये खटके उडू लागले. अखेर मामा-मामीने तिला आजोबांकडे सोडून ते नजफगढमध्ये रहायला गेले.
पोलिसांनी पुढे सांगितले की, पीडिता आजोबांसोबत एकटीच रहायला लागली. तेव्हा एका रात्री आजोबाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर हा प्रकारच सातत्याने सुरूच राहिला. दरम्यान, भविष्यात ही मुलगी मोठी झाल्यावर आपल्याबाबत घडलेल्या प्रकाराबद्दल सर्वांना सांगेन ही भीती आजोबाल स्वस्त बसू देत नव्हता. त्यामुळे घाबरलेल्या आजोबाने पीडितेला रोहिणी परिसरातील अनाथाश्रमात सोडले. आपल्यानंतर पीडितेला कोणीच नाही, असे कारण आजोबाने अनाथाश्रमास दिले होते.
दरम्यान, अनाथाश्रमातील कर्मचाऱ्यांसोबत हळूहळू पीडितेचा संवाद वाढत गेला. एक दिवस पीडितेने अशाच संवादात आजोबाच्या कृत्याबद्दल माहिती दिली आणि प्रकरणाचा भांडाफोड झाला. पोलिसांनी आरोपीला (आजोबा) अटक केली असून, पुढील तपास सुरू केला आहे.