German Ambassador Viral Video: एखादी नवी वस्तू खरेदी केली जाते तेव्हा भारतीय संस्कृतीमध्ये त्या वस्तूची रितसर पूजा केली जाते. हळदकुंकू लावून, फुलं अर्पण करून आणि अगदी लहानशी का असेना पण लहानमोठी गोष्ट घरात आल्यास गोडाधोडाचा पदार्थ करून तो आनंद साजराही केला जातो. अनेक मंडळी या नवी कार किंवा तत्सम गोष्ट खरेदी केल्यास त्यापुढं नारळ फोडून, त्याला कोणाची दृष्ट लागू नये यासाठी लिंबू मिरची लावताना दिसतात. या सर्व कृती, धारणा आणि समजुती भारतीयांसाठी नव्या नाहीत.
भारतासाठी, भारतीयांसाठी या सर्व गोष्टी सर्वसामान्य असल्या तरीही जेव्हा एखादी परदेशी व्यक्ती या सर्व मान्यतांनुसार कृती करताना दिसते तेव्हा मात्र अनेकांचचे डोळे चमकतात. सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळं असाच आश्चर्याचा धक्का अनेकांना बसत आहे.
भारतातील जर्मन राजदूत फिलिप एकरमॅन यांनी नुकतीच एक आलिशान ईव्ही खरेदी केली. नवी कार खरेदी केल्यानंतर त्यांनी भारतीय चालीरितींनुसार नारळ फोडला, कारवर लिंबू मिरचीसुद्धा बांधली. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्या यामध्ये जर्मन राजदूत नारळ फोडताना आणि कारमध्ये लिंबू मिरची बांधताना दिसत आहेत.
#WATCH | Delhi: German Ambassador to India, Philipp Ackermann switches to EV (electric vehicle); ties 'nimbu-mirchi' to his car and smashes a coconut on the occasion. pic.twitter.com/OojZh4Nvx3
— ANI (@ANI) October 15, 2024
हा व्हिडीओ राजदुतांच्या कार्यालयाबाहेरच शूट करण्यात आला असून नव्या कारचं स्वागत करतानाचा आनंद तिथं असणाऱ्या सर्वांच्याच चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. कार कोणतीही असो, ती नवी आहे, त्यामुळं नव्या वस्तूचं स्वागत होतं अगदी त्याचप्रमाणं या राजदूतांच्या कारचंही स्वागत करण्यात आलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसला. अनेकांनी तो रिशेअर केला, तर काही नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत भारतीय परंपरांना आत्मसात करणाऱ्या राजदुतांचं कौतुक केलं.