सुधा मूर्तींच्या नावाने अमेरिकेत लोकांची फसवणूक; दोन महिलांना अटक

इन्फोसिसच्या अध्यक्षा सूधा मूर्ती यांच्या नावाने अमेरिकेत फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन महिलांना बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. बंगळुरु पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आकाश नेटके | Updated: Sep 25, 2023, 03:23 PM IST
सुधा मूर्तींच्या नावाने अमेरिकेत लोकांची फसवणूक; दोन महिलांना अटक title=
(फोटो सौजन्य - PTI)

Crime News : इन्फोसिसच्या (infosys) अध्यक्षा आणि लेखिका सुधा मूर्ती (sudha murthy) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अशातच सुधा मूर्ती यांच्या तक्रारीवरुन दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकातील बंगळुरुमध्ये (bangalore) या दोन महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही महिला इन्फोसिस फाउंडेशनच्या सुधा मूर्ती यांचे नाव, फोटो आणि व्हिडिओ वापरून अमेरिकेतील लोकांना फसवत होत्या. पोलिसांनी (Bangalore Police) आरोपी महिलांना अटक केली आहे.

इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांच्या सहाय्यकांनी केलेल्या तक्रारीनंतर बंगळुरू शहर पोलिसांनी दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. सुधा मूर्ती यांच्या कार्यकारी सहाय्यक ममता संजय यांनी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लावण्या आणि श्रुती अशी आरोपी महिलांची नावे आहेत. दोघींनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये लोकांना फसवण्यासाठी सुधा मूर्ती यांच्या नावाचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. ममता संजय यांच्यातक्रारीनंतर जयनगर पोलिसांनी लावण्य आणि श्रुती या दोन महिलांवर गुन्हा दाखल केला.

सुधा मूर्तींच्या तक्रारीनुसार, त्यांना उत्तर कॅलिफोर्नियातील कन्नड कूटाच्या 50 व्या वर्धापन दिनात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमासाठी मूर्ती यांच्या कार्यालयाकडून नकार देण्यात आला. मात्र काही वेळानंतर सुधा मूर्ती यांच्या टीमला त्यांचे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटले. सुधा मूर्ती यांच्या कार्यालयातून त्या कार्यक्रमाच्या आयोजकांशी संपर्क साधला असता, लावण्‍या नावाच्या मुलीने आपण त्यांचे खासगी सचिव म्हणून ओळख करून दिली आणि सांगितले की, सुधा मूर्ती यांच्याशी माझे बोलणे झाले आहे आणि त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येत आहेत.

दुसऱ्या तक्रारीनुसार, श्रुती नावाच्या आरोपी महिला स्वत:ला उत्तर कॅलिफोर्नियातील कन्नड कुटाच्या सदस्य असल्याच्या सांगत होती. 26 सप्टेंबर आरोपी महिलेने सोशल मीडियावर कॅलिफोर्नियामध्ये 'मीट अँड ग्रीट' बद्दल लोकांमध्ये सुधा मूर्तींबद्दलची दिशाभूल करणारी जाहिरात दिली होती. त्या कार्यक्रमाला मूर्ती या प्रमुख पाहुण्या असतील या दाव्यानुसार तिकीटांची विक्री करण्यात आली होती. आरोपींनी लोकांना या कार्यक्रमाची तिकिटेही विकली होती. श्रुती नावाच्या महिलेने 3 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीची तिकिटे विकल्याचा आरोप आहे.

जयनगर पोलिसांनी याप्रकरणी लावण्या आणि श्रुती नावाच्या महिलेला अटक केली आहे. दोन्ही महिलांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (सी) आणि 66 (डी) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 419 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.