'उरी' चित्रपटाचा पाकिस्तानला धसका

चित्रपट पाहिल्यानंतर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक होण्याची पाकिस्तानला भिती

Updated: Feb 6, 2019, 01:18 PM IST
'उरी' चित्रपटाचा पाकिस्तानला धसका title=

मुंबई : पाकिस्तानी सेना यावेळी भारताकडून कोणतीतरी मोठी कारवाई होणार असल्याच्या असल्याच्या संशयावरून भीतीच्या सावटाखाली आहे. गेल्या महिन्यापासून पाकिस्तानी सेनेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी भारतीय सीमेवरील महत्त्वाच्या चौक्यांचा सतत दौरा केला आहे. जानेवारीमध्ये २० तर फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत ५ वेळा हे दौरे करण्यात आले आहेत. लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल यासांरख्या अधिकाऱ्यांनी सीमेवर दौरे केले आहेत. विशेष बाब म्हणजे या साऱ्यामागे जबाबदार ठरविले जात आहे ते 'उरी- द सर्जिकल स्ट्रइक' या चित्रपटाला. 

रावलपिंडी मुख्यालयातील १० कोर आणि गिलगिट मुख्यालयातील कमांडरांनी सतत छंब, गुलटारी, वाघा, मुजफ्फराबाद, हाजी पीर आणि कोटली सेक्टरच्या भागाचा दौरा केला आहे. या भागात पाकिस्तानी सेनेला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानचे दहशतवादी ज्या ठिकाणाहून काश्मीरमध्ये घुसखोरी करतात त्या ठिकाणी पाकिस्तानी सेना तैनात करण्यात आली आहे. 

अफगाणिस्तान सीमेवर सतत सुरू असलेल्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे पाकिस्तानी सेनेमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले. पाकिस्तानच्या मोठ्या संसाधनांचा साठा अफगाणिस्तान सीमेवर लावण्यात आला आहे. त्यामुळे भारताने सीमेवर कोणतीही कारवाई केली तर दोन्ही सीमांवर लढण्यासाठी पाकिस्तानला मोठे कठीण जाणार आहे. येत्या काही दिवसांत भारताकडून आणखी एक सर्जिकल स्ट्राईक होणार असल्याची शंका पाकिस्तानी सेनेच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे. 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'उरी' चित्रपटाने पाकिस्तानी सेनेच्या अधिकाऱ्यांसह इतर देशांच्या गुप्तचर यंत्रणांनाही मोठे चिंतीत टाकले आहे. पाकिस्तानने 'उरी' चित्रपट डार्क नेट किंवा टोरंटद्वारे बघितला असल्याचे समजते आहे. चित्रपट पाहिल्यानंतर भारताकडून सर्जिकल स्ट्राईक होणार असल्याची पाकिस्तानला शंका आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून आपल्या अधिकारी आणि सैनिकांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. पाकिस्तानी सेनेत अफवा आणि कोणत्याही प्रकारची भीती निर्माण होऊ नये यासाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.