देवदर्शनासाठी जात असलेल्या बसला भीषण अपघात, 11 भाविकांचा मृत्यू

या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नम्रता पाटील | Updated: May 26, 2024, 08:26 AM IST
देवदर्शनासाठी जात असलेल्या बसला भीषण अपघात, 11 भाविकांचा मृत्यू title=

Uttar Pradesh Road Accident : उत्तप्रदेशातील शाहजहांपूर या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. सीतापूरहून उत्तराखंडच्या पूर्णगिरीकडे जाणाऱ्या भाविकांच्या बसला डंपरने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की संपूर्ण डंपर बसवर पलटी झाला. या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

या घटनेबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीतापूरहून काही भाविकांची बस उत्तराखंडमधील पूर्णागिरी या ठिकाणी देवदर्शनासाठी जात होती. त्यावेळी खुटर परिसरातील गोला बायपास रोडवरील ढाब्याजवळ उभ्या असलेल्या भाविकांच्या बसला डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत डंपर हा बसवर उलटला.  शाहजहांपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. 

नेमकं काय घडलं?

गोला बायपास रोडवर रात्री 11.30 च्या सुमारास एका ढाब्याजवळ ही बस जेवणासाठी थांबली होती. यावेळी काही प्रवाशी हे जेवण करत होते. तर काही प्रवाशी हे बसमध्ये बसले होते. यावेळी एका अनियंत्रित डंपरने भाविकांच्या बसला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की बसच्या डाव्या बाजूचा भाग पूर्णपणे चेपला गेला. या दुर्घटनेत 11 भाविकांचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व लोक कमलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीतापूर, बडा जेठा या ठिकाणी असलेल्या सिधौली या ठिकाणचे रहिवाशी होते. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अशोक कुमार मीणा यांनी दिली. 

तब्बल 3 तास या घटनेचे बचावकार्य सुरु होते. या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या घटनेप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच सध्या या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींवर उपचार सुरु आहेत. तसेच मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत दिली जाईल, असेही डीएम उमेश प्रताप सिंह यांनी सांगितले.