BJP RSS Meeting Next National President: भारतीय जनता पार्टीचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल याबद्दलची उत्सुकता अद्यापही कायम आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर राष्ट्रीय अध्यक्ष निवडणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भाजपा उत्सुक आहे. असं असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर झालेल्या बैठकीमध्ये भाजपचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष महिला किंवा ओबीसी असावा यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. एखाद्या महिलेकडे भाजपाचे अध्यक्षपद सोपवलं जावं अशा अनुषंगाने चर्चा झाली. दिल्लीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये ही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी भाजपा आणि आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांची 5 तास बैठक झाली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आरएसएस सदस्य दत्तात्रय होसबले आणि सह सरचिटणीस अरुण कुमार बैठकीत उपस्थित होते. या बैठकीमध्ये भाजपाचा पुढचा अध्यक्ष कोण असावा यावर चर्चा झाली. भाजपचा पुढील अध्यक्ष महिला किंवा ओबीसी असू शकतो, अशीही चर्चा या बैठकीमध्ये झाली. महिलेला राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासंदर्भात साकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. 2029 मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिला कोट्याची अंमलबजावणी होणार आहे. भाजपकडे यापूर्वी कधीही महिला अध्यक्ष झालेली नाही. त्यामुळे महिला अध्यक्षांचा विचार केला जाऊ शकतो, असं या बैठकीनंतर सांगितलं जात आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चर्चा करूनच पुढचा अध्यक्ष निवडला जाईल, हे भाजपाने स्पष्ट केलं आहे. संघटनेला सांभाळण्यासाठी सक्षम व्यक्ती अध्यक्ष पदावर असायला हवी, असे संघाचे मत आहे.
बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा भाजपा आणि संघाच्या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आला. बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेचा विचार करून सरकारने भारत-बांग्लादेश सीमेवरच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ईशान्य भारतातील अनेक राज्यांनी आपल्या राज्यांमध्ये निर्वासितांना आश्रय न देण्याची भूमिका घेतली आहे. बांगलादेश सरकारने आपल्या देशात अल्पसंख्यक हिंदूंचे रक्षण केले पाहिजे, कारण ते बांगलादेशी आहेत. असं संघाने आपली भूमिका मांडताना भाजपाला सांगितल्याचं समजतं. आता केंद्र सरकारच्या माध्यमातून हा संदेश बांगलादेशला दिला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.