नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वाचे संकेत दिले. यावेळी मोदींनी म्हटले की, कोरोना आपल्यासोबत दीर्घकाळ राहील, असे जगभरातील तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, आपल्याला हा संपूर्ण काळ कोरोनाविरुद्धच्या लढाईत गुंतून पडायचे नाही. त्यासाठी आपण लॉकडाऊनचा चौथा टप्पा हा अत्यंत नव्या स्वरुपाचा आणि नियमांचा असेल. राज्यांकडून मिळणाऱ्या सूचनांच्या आधारे याची आखणी केली जाईल आणि १८ मे पूर्वी नागरिकांना याबाबत सूचित केले जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
'एकही पीपीई किट नसणाऱ्या भारतात दिवसाला दोन लाख किट्सची निर्मिती'
समस्त मानवजातीने आजपर्यंत कोरोनासारख्या संकटाचा सामना केलेला नाही. त्यामुळे ही परिस्थिती अभूतपूर्व अशीच आहे. मात्र, आपल्याला थकून किंवा हार मानून चालणार नाही. आगामी काळात स्वत:ला वाचवण्यासोबतच आपल्याला पुढे वाटचालही करायची आहे. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती दाखवण्याची गरज यावेळी नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखविली.
देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मोदींकडून २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात देशाला स्वयंपूर्ण करण्याच्यादृष्टीने भारतीयांनी विचार करायला सुरुवात करावी, या मुद्द्यावर विशेष भर दिला. कोरोनाच्या संकटामुळे जागतिक व्यवस्थेतील कच्चे दुवे उघडे पडले आहेत. या काळात आपल्याला स्थानिक स्रोतच अधिक कामाला आले, याकडे मोदींनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या संकटापूर्वी भारतात पीपीई किट आणि एन-९५ मास्कचे नाममात्र उत्पादन केले जायचे. मात्र, सध्या भारतामध्ये प्रत्येक दिवशी जवळपास दोन लाख पीपीई किट आणि एन-९५ मास्कचे उत्पादन होते. भारताने संकटाचे संधीत रुपांतर केल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मोदींनी सांगितले.