मुंबई : हॉलिवूड चित्रपटांचे शौकीन लोक अभिनेता ब्रूस विलिस यांना ओळखत असतील. परंतु या अभिनेत्याला असा कोणता तरी आजार असेल, ज्यामुळे त्याचं अभिनय करिअर धोक्यात येईल असा कोणीही विचार केला नसावा. परंतु हे खरं आहे. हॉलिवूडमध्ये तब्बल 40 वर्षे घालवणाऱ्या ब्रूस विलिसने अभिनयातून निवृत्ती घेतली आहे. याचे कारण ब्रुस विलिसचा आजार आहे. या आजाराचे नाव Aphasia आहे. हा एक मेंदूचा विकार आहे. ब्रूस विलिस हा Aphasia चा शिकार झाला आहे. त्यामुळे आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनयाला करिअरल अलविदा करत असल्याची माहिती अभिनेत्याच्या कुटुंबाने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
ब्रूस विलिस हा आता 67 वर्षांचा आहे आणि त्याच्या या आजाराबाबत कळताच लोकांमध्ये या आजाराबाबत जाणून घेण्याची इच्छा देखील वाढली आहे. चला तर मग याबाबत काही माहिती जाणून घेऊया.
Aphasia हा मेंदूचा एक आजार आहे, ज्यामध्ये मेंदू संवाद साधण्याची क्षमता गमावतो. त्याचा परिणाम व्यक्तीच्या भाषा बोलण्यावर, लिहिण्यावर आणि समजण्यावर होतो.
अशा लोकांचा मेंदू हा शब्द समजण्यासाठी सक्षम असतो, परंतु मेंदू तो ते शब्द बोलण्यासाठी जिभेला सिग्नल देऊ शकत नाही. या आजारात माणसाच्या मनात विचार बरोबर येतो, पण अनेक वेळा योग्य शब्द बोलण्यासाठी किंवा मांडण्यासाठी सूचत नाही, ज्यामुळे अशा लोकांना बोलण्यात अडचण येते. त्याचप्रमाणे, जेव्हा लोक काही बोलत असतात तेव्हा त्यांची भाषा समजणे कठीण होते.
अॅफेसिया कोणत्याही वयात होऊ शकते. परंतु वयानुसार त्याचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब असलेले रुग्ण, हृदयरोगी आणि भरपूर धूम्रपान करणारे लोक या आजाराला बळी पडतात कारण या तीन आजारांमुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. आपण हे अशा प्रकारे देखील समजू शकता की, या रोगात मेंदूची भाषा प्रक्रिया विस्कळीत होते.
इंडियन अकादमी ऑफ न्यूरोलॉजीच्या 2 वर्ष जुन्या आकडेवारीनुसार, भारतात 20 लाख लोक या आजाराने ग्रस्त आहेत. मेंदूच्या इतर आजारांप्रमाणेच या आजारावरही उपचार करणे हे शास्त्रज्ञांसाठी एक आव्हान आहे.