लॉकडाऊनमध्ये पोटदुखीची तक्रार असणाऱ्या रूग्णांमध्ये ७० टक्के वाढ

२५ ते ५० वयोगटातील नागरिकांमध्ये जीईआरडीची समस्या – बैठ्या जीवनशैलीचा परिणाम

Updated: Aug 21, 2020, 12:49 PM IST
लॉकडाऊनमध्ये पोटदुखीची तक्रार असणाऱ्या रूग्णांमध्ये ७० टक्के वाढ title=

मुंबई:  कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी देशभरात गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र शारीरीक हालचालींची कमतरता, बैठी जीवनशैली यामुळे नागरिकांना छातीत जळजळ, ओटी पोटात दुखणे, मळमळणे गिळण्यास अडचणी, पोट खराब होणे आदी लक्षणांसह असलेल्या गॅस्ट्रोएफॅगेअल रिफ्लक्स सारख्या म्हणजेच पोटदुखीच्या आजारात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.  लॉकडाऊन कालावधीमध्ये या आजाराच्या रुग्णांमध्ये ७० टक्क्यांनी वाढ झाली असून हे रुग्ण २५ ते ५० वर्ष वयोगटातील आहेत, अशी माहिती अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल मुंबईचे लॅप्रोस्कोपिक जीआय सर्जन डॉ. इरबाज रियाझ मोमीन यांनी दिली.

लॉकडाऊन कालावधीमध्ये बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे एसोफेजियल रिफ्लक्स (जीईआरडी) सारख्या आजाराची तक्रार असलेले 3 ते 4 रुग्ण दिवसभरात आढळून येत असल्याचेही डॉ. इरबाज रियाझ मोमीन सांगतात. डॉ. मोमीन सांगतात दुबई येथे काया रुग्णाचे यापूर्वी जीईआरडीवर उपचार करण्यात आले होते. एका रुग्णाने फोनच्या माध्यमातून डॉक्टरांशी संपर्क साधला होता. लॉकडाऊनमुळे असलेल्या नियमावलीमुळे रुग्णाला उपचाराकरिता मुंबईत येणे शक्य नव्हते. मात्र आता निर्बध शिथिल करण्यात आले असून हा रुग्ण शस्त्रक्रियेसाठी मुंबईत येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांना आलेल्या आर्थिक अडचणी तसेच आरोग्याच्या समस्येमुळे हे नागरिक चिंताग्रस्त आहेत. चहा, कॉफी किंवा अल्कोहोलचे अतिसेवन केल्याने झोपेच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. घरबसल्या लोक अधिक तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खातात आणि शारीरिक हालचाली मात्र मंदावल्या आहेत. या कारणांमुळे नागरिकांमध्ये पोटाच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत, असेही डॉ मोमीन यांनी स्पष्ट केले. .
आपण खाल्लेले अन्न तोंडातून अन्ननलिकेद्वारे जठरामध्ये जाते. अन्ननलिकेच्या खालच्या टोकाशी एक झडप असते. ही झडप उघडली की अन्न जठरामध्ये जाते व झडप पूर्ण बंद होते. ही झडप बंद झाल्यामुळे अन्न व जठरातील आम्ल पुन्हा उलट मार्गाने अन्ननलिकेत प्रवेश करू शकत नाही. अशा रीतीने एकेरी वाहतूक सुरळीत सुरु असते. ज्यांना जीईआरडी चा त्रास असतो त्या लोकांमध्ये ही झडप पूर्ण बंद होत नाही. त्यामुळे खाल्लेले अन्न व जठरातील आम्ल उलट मार्गाने पुन्हा अन्ननलिकेत प्रवेश करते.

डॉ मोमीन सांगतात की, लॉकडाऊनदरम्यान अशा रुग्णांवर सध्या औषधोपचार केले जात आहेत. त्यानंतर काही विशिष्ट प्रकरणांमध्ये एन्डोस्कोपीद्वारे मूल्यांकन केले जाते. मुळात या आजाराचे वेळीच निदान होणं गरजेचं आहे. कारण उपचारास उशीर झाल्यास गुतांगुत वाढून अन्ननलिकेचा कर्करोग होण्याची शक्यता २५ पट वाढते. अ‍ॅसिड रिफ्लक्स असणा-या रूग्णांना प्रदीर्घकाळ अँटी-एसिडिटी औषधे दिली जाऊ शकतात ज्यामुळे आम्लाचे प्रमाण कमी होते. काही रुग्ण लेप्रोस्कोपिक अँटी-रिफ्लक्स शस्त्रक्रिया करणे हा पर्य़ाय सुद्धा निवडू शकतात जे अ‍ॅसिड रिफ्लक्सला प्रतिबंध करते. बहुतेक रुग्ण अँटी-रिफ्लक्स शस्त्रक्रियेच्या परिणामांमुळे समाधानी आहेत. हा पर्याय सुरक्षित आहे आणि रुग्ण लवकरच दैनंदिन कामांना सुरुवातही करू शकतो. तरी देखील या तक्रारी जाणवू नये याकरिता सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे,  प्रमाणात अन्नपदार्थ खावेत आणि रात्री उशीरा जेवण टाळावे. जेवणानंतर लगेच न झोपू नयेत, कॉफीचे सेवन कमी प्रमाणात करावेत, असा सल्लाही डॉ मोमीन यांनी दिला.