"काजोलनं नाव नाही घेतलं पण भक्त नाराज झालेत"; अभिनेत्रीच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची टीका

Actress Kajol : राजकीय नेत्यांबद्दलच्या केलेल्या टिप्पण्यांमुळे अभिनेत्री काजोल चांगलीच चर्चेत आली होती. तिच्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्यानंतर अखेर तिने त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. माझा कोणाला बदनाम करण्याचा उद्देश नव्हता असं काजोलनं म्हटलं आहे. 

आकाश नेटके | Updated: Jul 9, 2023, 08:24 AM IST
"काजोलनं नाव नाही घेतलं पण भक्त नाराज झालेत"; अभिनेत्रीच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची टीका title=
(फोटो सौजन्य - PTI)

Actress Kajol : बॉलिवूडमधून बराच काळ ब्रेक घेतलेल्या अभिनेत्री काजोलने (kajol) पुन्हा एका वेब सीरिजमधून पुनरागमन केलं आहे. काजोल आता 'द ट्रायल' या वेब सीरिजमध्ये (The Trial) दिसणार आहे. मात्र त्याआधीच काजोल चर्चेत आली आहे. काजोलने द ट्रायलच्या प्रमोशनदरम्यान केलेली टिप्पणीमुळे तिच्यावर टीका केली जात आहे.  काजोलने नुकतेच देशातील अशिक्षित राजकारण्यांबद्दल भाष्य केले होते. सोशल मीडियावर तिचे विधान व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर निशाणा साधण्यात आला होता. या वादामध्ये आता ठाकरे गटानेही (Shiv Sena) उडी घेतली आहे.

काजोलने केलेले वक्तव्य ठाकरे गटाच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी भाष्य केलं आहे.  देशात असे राजकीय नेते आहेत ज्यांच्याकडे शिक्षण नाही, असे काजोलनं म्हटलं होतं. 'द क्विंट'ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काजोलने याबाबत भाष्य केले होते. "भारतातील बदल संथ गतीने होत आहेत कारण लोक परंपरांमध्ये अडकलेले आहेत आणि योग्य शिक्षणाचा अभाव आहे. आपल्याकडे शिक्षण नसलेले राजकीय नेते आहेत. मला माफ करा, पण मी बाहेर जाऊन पुन्हा सांगेन. देशावर राजकारण्यांची सत्ता आहे. त्यांच्यामध्ये असे बरेच आहेत ज्यांना योग्य दृष्टीकोन देखील नाही, जे माझ्या मते शिक्षणाच्या अभावामुळे आहे," असे काजोलनं म्हटलं आहे.

या विधानावर या शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "काजोल म्हणते की आपल्यावर अशिक्षित आणि दूरदृष्टी नसलेल्या नेत्यांचे राज्य आहे. कोणीही रागावले नाही कारण त्याचे मत खरे असेलच असे नाही आणि त्यांनी कोणाचे नावही घेतले नाही. पण सर्व भक्त रागावले आहेत. कृपया तुमचे संपूर्ण राजकारणाचे ज्ञान घेऊ नका," असे ट्वीट प्रियांका चतुर्वेदी यांनी केले आहे.

काजोलने दिलं स्पष्टीकरण

या सर्व वादावर अखेर काजोलने 8 जुलै रोजी तिच्या ट्विटरवर स्पष्टीकरण दिले आहे. "मी फक्त शिक्षण आणि त्याचे महत्त्व यावर बोलत होते. माझा उद्देश कोणत्याही राजकीय नेत्याला बदनाम करण्याचा नव्हता. आपल्याकडे काही महान नेते आहेत जे देशाला योग्य मार्गावर घेऊन जात आहेत," असे काजोलनं म्हटलं आहे.

दरम्यान, काजोल 'द ट्रायल' या वेब सीरिजद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अमेरिकन कोर्टरूम ड्रामा 'द गुड वाईफ'ची ही हिंदी आवृत्ती आहे. जिशू सेनगुप्ता तिच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही वेब सिरीज 14 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.