महाराष्ट्रातील रहस्यमयी विहिर, माणसं वाढतात तसं पाणी वाढतं; इथचं भरते एकनाथ शिंदेंच्या गावची यात्रा

महाराष्ट्रात एक अनोखी विहीर आहे. माणसं वाढतात तसं या विहीरीचे पाणी वाढतं. ज्या डोंगरावर ही विहीर आहे तिथेच  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावची यात्रा भरते. 

वनिता कांबळे | Updated: Jan 20, 2025, 11:45 PM IST
 महाराष्ट्रातील रहस्यमयी विहिर, माणसं वाढतात तसं पाणी वाढतं; इथचं भरते एकनाथ शिंदेंच्या गावची यात्रा  title=

Satara Dare Village Utteshwer Yatra 2025 : महाराष्ट्रात एक अशी रहस्यमयी विहीर आहे. जशी माणसं वाढतात तसं या विहीचे पाणी वाढते असे सांगितले जाते. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावची यात्रा जिथे भरते त्या  श्री उत्तेश्वराच्या डोंगरावरच  ही विहीर आहे. जाणून घेऊया  श्री उत्तेश्वर मंदिर तसेच उत्तेश्वर यात्रे विषयी आणि इथं असलेल्या या अनोख्या विहीरी विषयी. 

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री उत्तेश्वर देवाच्या यात्रे निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावात येतात.  श्री उत्तेश्वराच्या डोंगरावर भाविकांची दर्शनासाठी  मोठी गर्दी  असते. पंचक्रोशीतील गावातील मानाच्या पालख्या उत्तेश्वराच्या डोंगरावर येतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घराण्याचा दीपमाळ प्रज्वलित करण्याचा मान असतो. या    श्री उत्तेश्वर मंदिराबाबत अनेक अख्यायिका आहेत. इथल्या विहीरीचे एक खास वैशिष्ट्य आहे. 

साताऱ्यातील जावळीच्या खोऱ्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील प्रतापगड पासून ते त्रिवेणी संगम पींपर पर्यंतच्या डोंगर रांगेवर वाळणे - गावडोशी गावच्या डोंगर रांगेवर उत्तेश्वराची निर्मिती झाली. उत्तेश्वर यात्रा ही भगवान शंकराची यात्रा असून यात तापोळा भागातील वाळणे, दरे, उतेकर वणवली, निवळी, गावढोशी अशा अनेक गावांची मिळून ही यात्रा भरते.  यात्रेसाठी मुंबई, पुणे, रायगड आणि रत्नागिरी येथून मोठया प्रमाणात उत्तेकर व त्यांचे नातेवाईक येत असतात. 

घनदाट जंगलाने वेढलेल्या तापोळाजवळील उत्तेश्वर डोंगरावरच उत्तेश्वर मंदिर आहे. उत्तेश्वर हे ठिकाण म्हणजे साताऱ्यातील पर्यटनाचा एक छुपा खजिनाच आहे.  एक गाय दररोज शिवलिंगाचे दर्शन घेऊन त्यावर दूध टाकत असे अशी आख्यायिका आहे. यानंतर येथे शिवलिंग शोधून त्याभोवती मंदिर बांधण्यात आले. जानेवारी महिन्यात उत्तेश्वराची मोठी यात्रा भरते. रात्रीच्या वेळेस देवांच्या पालख्या निघतात. उत्तेश्वर यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविकांचा मेळा उत्तेश्वर डोंगरावर भरतो. उत्तेश्वर मंदिराजवळ एक अनोखी विहीर आहे. जशी माणसं वाढतात तसं या विहिरीचे पाणी वाढतं असं येथील ग्रामस्थ सांगतात. या विहीरीचे पाणी देखील अतिशय चवदार आहे असेही येथे येणारे सांगतात.