Shriya Pilgaonkar On Adopted Child : दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर ही घराघरात प्रसिद्ध आहे. तिने आपल्या आई-बाबांच्या पावलावर पाऊल टाकत सिनेसृष्टीत पदार्पण केले. एकुलती एक या मराठी चित्रपटातून ती पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकली. त्यानंतर ती मराठी, हिंदी चित्रपट, वेब सिरीज अशा विविध कलाकृतींमध्ये झळकली. ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रिया पिळगावकर सध्या ब्रोकन न्यूज 2 या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.
'ब्रोकन न्यूज' या वेबसीरिजचा दुसरा सीझन 3 मे 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजमध्ये तिने राधा भार्गव हे पात्र साकारले आहे. सध्या ती या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या निमित्ताने तिने नुकतंच 'इंडिया टुडे' या वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत श्रियाला "तू सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची दत्तक मुलगी असल्याच्या काही बातम्या मध्यंतरी आल्या होत्या, त्याकडे तू कसं बघतेस", असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने मनमोकळेपणाने भाष्य केले.
"काही महिन्यांपूर्वी मला दत्तक घेण्यात आलं होतं, असे एका बातमीत म्हटलं होतं. पण हे वृत्त पूर्णपणे खोटं आहे. मला माझ्या आई-वडिलांनी दत्तक घेतलेले नाही. त्यांनी मला दत्तक घेतल्याची ती बातमी पूर्णपणे चुकीची आणि खोटी आहे", असे श्रिया पिळगावकरने म्हटले.
त्यापुढे ती म्हणाली, "खरंतर यावर मी काही स्पष्टीकरण द्यावं, असा हा विषय नाही. कारण मी माझी बाजू मांडण्यासाठी माझ्या जन्माचे प्रमाणपत्र इन्स्टाग्रामवर पोस्ट करणार नाही किंवा ते दाखवणारही नाही. पण हो, ही बातमी खरी नसली तरी हास्यास्पद नक्कीच होती. पण याशिवाय माझ्याबद्दल कोणत्याही वाईट गोष्टी लिहिलेल्या नाहीत."
दरम्यान सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रियाचा जन्म 25 एप्रिल 1989 मध्ये झाला. 'तू तू मै मे' या हिंदी मालिकेतून बालकलाकर म्हणून ती झळकली. त्यावेळी ती अवघ्या 5 वर्षांची होती. त्यानंतर तिने 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एकुलती एक' या चित्रपटात काम केले. यानंतर तिने शाहरुख खानच्या 'फॅन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर श्रिया 'मिर्झापूर', 'गिल्टी माईंड्स', 'द ब्रोकन न्यूज', 'ताजा खबर' यांसारख्या वेबसीरिजमध्ये झळकली. सध्या ती 'ब्रोकन न्यूज 2' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.