'कोणीही असं प्रेम...', नागा चैतन्य आणि शोभिता याचं लग्न लागताच समांथाची Instagram पोस्ट; रंगली एकच चर्चा

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभितासह (Sobhita Dhulipala) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. नागा चैतन्यने सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे फोटो शेअर करताच काही वेळात समांथाने पोस्ट शेअर केली आहे.     

शिवराज यादव | Updated: Dec 9, 2024, 01:56 PM IST
'कोणीही असं प्रेम...', नागा चैतन्य आणि शोभिता याचं लग्न लागताच समांथाची Instagram पोस्ट; रंगली एकच चर्चा title=

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री समांथा प्रभूने (Samantha Ruth Prabhu) सोशल आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचं कारण तिचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्य याच्या लग्नानंतर तिने ही पोस्ट शेअर केली आहे. दाक्षिणात्य अभिनेता चैतन्य (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभितासह (Sobhita Dhulipala) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. नागा चैतन्यने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्याने हे फोटो शेअर केल्यानंतर काही मिनिटातच समांथाने ही पोस्ट शेअर केली असल्याने वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. 

समांथाने आपला श्वान साशासह फोटो शेअर केला आहे. या फोटो साशा समांथाच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. हा फोटो इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "साशाप्रमाणे कोणीही प्रेम करत नाही".

शुक्रवारी, अभिनेत्रीने एक गूढ पोस्ट टाकली ज्यामध्ये असं लिहिलं होतं की, "जसं वर्ष संपत आहे, आम्ही आमच्या प्रवासाला आकार देणाऱ्या चढ-उतारांवर विचार करतो. आव्हाने ते विजय, वाढ आणि आनंदाचे क्षण, तुम्ही एका चमकत्या ताऱ्याप्रमाणे ते साध्य केले आहे. या वर्षाने आपली परीक्षा घेतली आहे, परंतु त्याने आम्हाला सामर्थ्य, लवचिकता आणि चिकाटीचे सौंदर्य देखील शिकवले आहे". 

4 नोव्हेंबरला नागार्जुन यांनी नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नातील अनेक फोटो शेअर केले. शोभिताने लग्नात सोनेरी कांजीवरम साडी परिधान केली होती. दुसरीकडे, नागा चैतन्यने धोतर आणि पांढरा कुर्ता घातला होता. नागार्जून यांनी फोटो शेअर करताना लिहिलं होतं की, "शोभिता आणि चे यांना एकत्र या सुंदर अध्यायाची सुरुवात करताना पाहणे हा माझ्यासाठी खास आणि भावनिक क्षण होता. माझ्या प्रिय चेचे अभिनंदन आणि प्रिय शोभिता--तुझे कुटुंबात स्वागत आहे. तू आधीच आमच्या आयुष्यात खूप आनंद आणला आहे."

ते पुढे म्हणाले, "जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थापित केलेल्या एएनआर गारुच्या पुतळ्याच्या आशीर्वादाखाली उलगडत असताना हा उत्सव आणखी खोल अर्थपूर्ण आहे. या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचे प्रेम आणि मार्गदर्शन आमच्यासोबत आहे. मी त्यांचे आभार मानतो. आज आमच्यावर कृतज्ञतेने असंख्य आशीर्वादांचा वर्षाव झाला."

नागा चैतन्य आणि समांथा प्रभू यांचं लग्न झालं होतं. 2017 मध्ये ते विवाहबंधनात अडकले आणि ऑक्टोबर 2021 मध्ये घटस्फोट घेतला.