...म्हणून राणी मुखर्जी आणि काजोल 'कुछ कुछ होता है'च्या सेटवर बोलायच्यात नाहीत; 25 वर्षांनी झाला खुलासा

राणी मुखर्जी आणि काजोल यांनी नुकतीच 'कॉफी विथ करण' कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी करण जोहरने त्यांना 'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान तुम्ही एकमेकींशी फार बोलत का नव्हता? अशी विचारणा केली.   

शिवराज यादव | Updated: Nov 30, 2023, 12:58 PM IST
...म्हणून राणी मुखर्जी आणि काजोल 'कुछ कुछ होता है'च्या सेटवर बोलायच्यात नाहीत; 25 वर्षांनी झाला खुलासा title=

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी आणि काजोल यांनी हजेरी लावली. त्यामुळे एका प्रकारे हे 'कुछ कुछ होता है' चित्रपटाचं रियुनिअन होतं. यावेळी दोन्ही अभिनेत्रींनी पडद्यामागे आपलं नातं नेमकं कसं आहे यावर भाष्य केलं. राणी मुखर्जी आणि काजोल या चुलत बहिणी आहेत. राणी मुखर्जीने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा काजोल आधीच एक प्रसिद्ध हिरोईन होती. दरम्यान करण जोहरने कार्यक्रमात राणी मुखर्जी आणि काजोल यांना तुम्ही बहिणी असूनही 'कुछ कुछ होता है' च्या शुटिंगदरम्यान तुमच्यात फार सख्य का नव्हतं? अशी विचारणा केली. काजोलने यावेळी आमच्यात एक कृत्रिम दुरावा होता असं स्पष्ट केलं. 

करण जोहरने राणी आणि काजोलला म्हटलं की, "मी विचार करायचो की हे कसलं कुटुंब आहे? हे साधं एकमेकांशी बोलतही नाहीत. मला वाटलं होतं या चुलत बहिणी आहेत. यांच्यात सर्व काही चांगलं आहे". 

यावर राणी मुखर्जीने स्पष्टीकरण देत सांगितलं आहे की, मी काजोलला लहानपणापासून ओळखत होते. आमच्यातील नातं हे थोडं विचित्र होतं. पण ती माझ्यासाठी नेहमीच काजोलदीदी आहे. यावेळी राणीने जसजसं वय वाढत जातं तसंतसे लोक लांब का जातात हे समजत नाही अशी खंतही व्यक्त केली. दरम्यान यावेळी तिने काजोलसोबतच्या नात्यात थोडं अंतर असलं तरी तनिषा मुखर्जीच्या आपण फार जवळ असल्याचं सांगितलं. 

दरम्यान तुमच्यात मैत्री कधी झाली? आणि नातं घट्ट कधी झालं? असा प्रश्न करण जोहरने विचारला. त्यावर राणीने आम्ही वडिलांना गमावल्यानंतर असं उत्तर दिलं. "कुटुंबीय असताना जेव्हा तुमच्या जवळचे लोक गमावता. काजोलच्या वडिलांशी माझं नातं चांगलं होतं. जेव्हा तुम्ही कठीण काळातून जात असतान, जेव्हा तुमचे प्रिय लोक सोडून जातात तेव्हा कदाचित सगळे जवळ येतात," असं राणी म्हणाली.

तसंच यामध्ये वयाचाही संबंध असावा असं ती म्हणाले. जेव्हा तुम्ही 17 वर्षांचे असता आणि 40 चे असता तेव्हा त्यात फरक असतो. तुम्हाला नंतर छोट्या गोष्टींमुळे फरक पडत नाही असं राणीने सांगितलं. 'कुछ कुछ होता है' नंतर राणी मुखर्जी आणि काजोल यांनी एकत्र कोणत्याच चित्रपटात प्रमुख भूमिका निभावली नाही.