मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआरही रांगेत; पाहा VIDEO

Telangana Assembly Elections 2023 : सजग नागरिक म्हणून हे कलावंतसुद्धा त्यांचा मतदानाचा हक्क बजावताना दिसले. त्यांना रांगेत पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 

सायली पाटील | Updated: Nov 30, 2023, 11:30 AM IST
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआरही रांगेत; पाहा VIDEO  title=
telangana assembly election allu arjun jr ntr and other stars stood in line to vote photos videos

Telangana Assembly Elections 2023 : लोकशाही राष्ट्र अशी भारताची जगभरात ओळख असून, याच देशात सध्या या लोकशाहीचा जागर पाहायला मिळत आहे. अर्थात विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर देशातील महत्त्वाचं राज्य असणाऱ्या तेलंगणामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक दिवसांच्या प्रचारानंतर आता तेलंगणामध्ये नागरिक त्यांचा मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. 

कलावंतही यामध्ये मागे राहिलेले नाहीत. मुळात दक्षिणेकडील राज्यांमध्ये होणारी सत्तांतरं आणि तेथील स्थानिक राजकारण हा मुद्दा कायमच चर्चेत असतो. त्यातही 2024 च्या दृष्टीनं ही विधानसभा निवडणूक अधिक महत्त्वाची समजली जात आहे. तेलंगणातील याच 119 जागांसाठी लढल्या जाणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देण्यासाठी तेलुगू/ दाक्षिणात्य कलाजगतातील कलाकार मंडळींनीही न चुकता हजेरी लावली. 

टॉलिवूडमध्ये मेगास्टार अशी ओळख असणाऱ्या अभिनेता चिरंजीवी यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांची पत्नी सुरेखा आणि धाकटी मुलगी श्रीशासुद्धा त्यांच्यासोबतच होती. यावेळी चिरंजीवी यांनी रांगेत प्रतिक्षा करत त्यानंतर मतदान कक्षात जाऊन मत दिलं. तर, 'पुष्पा' फेम राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता अल्लू अर्जुनही यावेळी मतदानाचा हक्क बजावताना दिसला. 

हैदराबाद येथील ज्युबली हिल्स येथे त्यानं मतदान केलं. यावेळी सर्वसामान्य नागरिकांसोबतच अल्लू अर्जून मतनोंदणीसाठी रांगेत उभा राहिला. त्यावेळी आपल्या रांगेत चक्क अल्लू अर्जुन उभा आहे हे पाहूनच अनेकांच्या भुवया उंचावल्या, नागरिक त्याच्याकडे कुतूहलानं पाहत होते. यावेळी त्यानं नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. 

फक्त अल्लू अर्जुनच नव्हे, तर  'आरआरआर' फेम अभिनेता ज्युनिअर एनटीआर, त्याची पत्नी आणि आणि आईसोबत मतदान केंद्रावर दिसला. यावेळी मतदारांच्याच रांगेत उभं राहून या मंडळींनी मतदानाचा हक्क बजावला. तेलुगु कलाविश्व गाजवणाऱ्या कलाकारांनी संविधानानं दिलेला हक्क बजावल्याचं पाहून आणि इतरांना केलेलं आवाहन पाहून अनेकांनाच कौतुक वाटलं.