जया बच्चन फोटोग्राफर्सवर इतक्या का चिडतात? नीतू कपूर यांनी अखेर केला खुलासा, 'त्यांना ना जरा...'

80 च्या दशकात रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री नीतू कपूर आणि झिनत अमान यांनी 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.   

शिवराज यादव | Updated: Jan 11, 2024, 02:18 PM IST
जया बच्चन फोटोग्राफर्सवर इतक्या का चिडतात? नीतू कपूर यांनी अखेर केला खुलासा, 'त्यांना ना जरा...' title=

80 च्या दशकात रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री नीतू कपूर आणि झिनत अमान यांनी नुकतीच 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्या सुवर्णकाळातील आठवणी ताज्या करताना अनेक प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरं दिली. दोन्ही अभिनेत्रींनी यावेळी आपल्या खासगी आयुष्यातीलही अनेक गोष्टींचा उलगडा करताना आपल्या एकेकाळच्या सहअभिनेत्री हेमा मालिनी, रेखा यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान नीतू कपूर यांनी जया बच्चन नेहमी फोटोग्राफर्सवर का चिडतात? याचा खुलासा केला. तसंच जया बच्चन यांचा स्वभाव चांगला असल्याचंही म्हटलं. 

करण जोहरने एका सेगमेंटमध्ये दोन्ही अभिनेत्रींना रेखा यांच्यासह असणाऱ्या मैत्रीबद्दल विचारलं. त्यावर नीतू कपूर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितलं की, "मैत्री कशी सुरु झाली याची मला कल्पना नाही. पण त्या फारच मैत्रीपूर्ण स्वभावाच्या आहेत. त्या फार गोड आणि प्रेमळ आहेत. त्या तुम्हाला न कळवता अचानक भेटायला येतात. त्या फार मजेशीरही आहेत. त्या सतत मिमिक्री करत असतात". झीनत यांनीही नीतू कपूर यांना सहमती दर्शवत रेखा एकदा नेपियन्सी रोडवरील घऱी आल्याची आठवण सांगितली. 

नीतू कपूर यांनी यावेळी हेमा मालिनी यांच्या भेटीचा किस्सा सांगताना मिमिक्री करुन दाखवली. या भेटीदरम्यान रणबीर आणि रिधिमा त्यांच्यासोबत होते. हेमा यांनी दोघांची भविष्यात काय करण्याची इच्छा आहे असं विचारलं असता नितू यांनी अद्याप ते फार तरुण असून करिअरचा विचार केला नसल्याचं म्हटलं होतं. हेमा मालिनी यांच्यासह त्यांच्या मुली ईशा आणि अहानादेखील होत्या. आपल्या मुलींची अभिनेत्री होण्याची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. हेमा मालिनी फार उघड स्वभावाच्या असून, फार मैत्रीपूर्ण आहेत असं नीतू कपूर यांनी सांगितलं. 

जया बच्चन नेहमीच आपल्या रागिष्ट स्वभावामुळे चर्चेत असतात. अनेक जाहीर कार्यक्रमात त्यांनी फोटोग्राफर्सना झापलं आहे. तुम्हाला शिस्त नाही अशा शब्दांत त्यांनी सुनावल्याचे कित्येक व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. दरम्यान दुसरीकडे नीतू कपूर यांची मात्र फोटोग्राफर्सशी चांगली जमते. त्या नेहमी त्यांच्याशी हसत-खेळत गप्पा मारत असतात. नीतू कपूर यांनी यावेळी जया बच्चन मुद्दामून करत असाव्यात अशी शक्यता व्यक्त केली. 

नीतू कपूर यांनी सांगितलं की, 'मला वाटतं जयाजी मुद्दामून करत असाव्यात. त्यांनी एकदा केलं होतं, आणि जाणुनबुजून करतात. त्या तशा नाहीत. त्या फार प्रेमळ आहेत'. करणने यावेळी म्हटलं की, फोटोग्राफर्सनाही ते आवडत असावं. त्यावर नीतू कपूर यांनी उत्तर दिलं की, 'हो ते मजा घेतात. त्यादेखील आनंद लुटत असाव्यात. हे संगनमताने केलं जात असावं'.