Radhika deshpande Ayodhya Ram Mandir Temple : जवळपास पाच दशकांच्या प्रतिक्षेनंतर रामलल्ला अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाले. सोमवारी 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्याला देशभरातील दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली. यामुळे सध्या देशभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर एका महिन्याने एका मराठी अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे ही सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. 'आई कुठे काय करते' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. राधिकाने नाटक, मालिका, चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. आता राधिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यातील पहिला फोटो हा अयोध्येतील प्रभू श्री रामांचा आहे. तर दुसऱ्या फोटोत ती तिच्या आजी-आजोबा आणि भावंडांसह दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने अयोध्येतील राम मंदिराबद्दल वक्तव्य केले आहे.
आजी आजोबा रडले होते कार सेवकांसाठी, अयोध्येतल्या राम ललाला टेंट मधे राहावं लागतं आहे म्हणून. त्यांच्या डोळ्यात स्वप्न होतं ते राम मंदिराचं. आज आजी आजोबा नाहीत पण त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. २२ जानेवारी चा तो क्षण! मी ढसाढसा रडले. जणू माझ्या पूर्वजांचे अश्रू माझ्या डोळ्यातून वाहत होते. झालं गेलं विसरून जा असं सांगण्याची पद्धत आहे आपल्याकडे. पण पितृऋण विसरायचं नसतं. रामाच्या ऋणात आहोत आम्ही सगळेच. आमचं भाग्य की आम्हाला प्राणप्रतिष्ठा पाहता आली. काल एक महिना झाला. स्वप्नं मनापासून पाहिली की ती पूर्ण होतातच. रामनाम मुखी अखंड राहो, असे राधिका देशपांडेने म्हटले आहे.
आणखी वाचा : 'काय खाऊन जाड्या झालात?' नेटकऱ्याच्या प्रश्नाला मेघा धाडेचे जशास तसं उत्तर, म्हणाली 'तुझ्या पिताश्रींचं...'
दरम्यान राधिका देशपांडेच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. यावर एकाने भावस्पर्शी अशी कमेंट केली आहे. तर काहींनी जय श्रीराम अशी कमेंट केली आहे. तसेच काहींनी यावर हार्ट इमोजीही पोस्ट केले आहेत. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.