मुंबई : बॉलिवूडचा सुलतान सलमान खानचा आज हिंदी चित्रपटांवर दबदबा आहे. पण एक काळ असा होता की, पहिला चित्रपट मिळवण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. 1988चा काळ होता, जेव्हा हिंदी चित्रपटातील ब्रेकच्या शोधात सलमान खान एका निर्मात्याच्या ऑफिसमधून दुसर्या निर्मात्याच्या ऑफिसमध्ये भटकत होता. त्याचवेळी दिग्दर्शक जे.के. बिहारी 'बीवी हो तो ऐसी' नावाचा चित्रपट करत होते. या चित्रपटासाठी रेखा आणि फारुख शेख यांना कास्ट करण्यात आलं होतं.
याच सिनेमांत रेखाच्या मेहुण्याची एक छोटी भूमिका होती. ही भूमिका इतकी लहान होती की, चित्रपटसृष्टीतल्या कुठल्याही प्रसिद्ध चेहर्याला ही भूमिका करण्याची इच्छा नव्हती. तर दुसरीकडे, निर्माते या भूमिकेसाठी फारच कमी पैसेही देत होते. या चित्रपटाची सगळी तयारी या आधीच झाली होती, मात्र ही भूमिका अद्याप कास्ट केली गेली नव्हती.
जेव्हा या भूमिकेसाठी दिग्दर्शकाला कोणताच चेहरा मिळतं नव्हता, तेव्हा त्याने ठरवलं की, जो कोणी स्ट्रगलर ऑफिसमध्ये काम मागण्यासाठी येईल, तेव्हा त्याच्यात कोणतेच कलाकारी गुण न पाहता भूमिका देण्यात येईल. मीडिया रिपोर्टनुसार जेके बिहारी त्या दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये बसले होते आणि दुपारी सलमान खान त्यांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये आला.
दिग्दर्शक त्यांना पाहून खूश झाले आणि म्हणाले की, चित्रपटात काम करायची इच्छा आहे का? हे ऐकून सलमान देखील खूश झाला. आणि त्याने या भूमिकेला होकार दिला. त्याने आपले फोटो दिग्दर्शकाला दिले. पण दिग्दर्शकाने त्याचे फोटो घेण्यास नकार दिला आणि म्हणाले, 'तुला माझ्या सिनेमांत रोल पक्का, रेखाच्या मेहुण्याची भूमिका आहे, काय भूमिका असेल? याबद्दल मी तुम्हाला उद्या सिनेमा साईन केल्यावर सगळं समजावून सांगेन.
दिग्दर्शक जे.के.बिहारी यांचं हे बोलणं ऐकून सलमान खान खूपच खूश झाला आणि ऑडिशन न देता फोटो न पाहता चित्रपटात काम करण्याची संधी मिळताच तो आश्चर्यचकित झाला, तेही पहिलचं काम, रेखासोबत करायला मिळणार होतं.
सलमानचा 'बीवी हो तो ऐसी' हा चित्रपट प्रदर्शित झाला, मात्र या सिनेमांत त्याला फारशी ओळख मिळाली नाही, पण जेव्हा त्याचा दुसरा सिनेमा 'मैने प्यार किया' बॉक्स ऑफिसवर आला तेव्हा सगळीकडे सलमानचा बोलबाला झाला. त्यानंतर सलमान खानने कधीच मागे वळून पाहिलं नाही.