'मी महालक्ष्मीचा घोडा...', वर्षाला 4 चित्रपट का करतोस विचारणाऱ्यांना अक्षय कुमारने अखेर दिलं उत्तर

बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सरफिरा' (Sarfira) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यानिमित्ताने अक्षय कुमारने वर्षाला 4 चित्रपट करत असल्याने टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 13, 2024, 02:32 PM IST
'मी महालक्ष्मीचा घोडा...', वर्षाला 4 चित्रपट का करतोस विचारणाऱ्यांना अक्षय कुमारने अखेर दिलं उत्तर title=

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) जवळपास दर दोन ते महिन्यांनी नवा चित्रपट प्रदर्शित होत असतो. एकीकडे आमीर खानसारखे (Amir Khan) अभिनेते वर्षाला एकच चित्रपट करण्यावर भर देत असताना अक्षय कुमारचे एका वर्षात 4 ते 5 चित्रपट प्रदर्शित होत असतात. त्याच्या या निर्णयावर अनेकदा टीकाही होत असते. अक्षय कुमार दर्जात्मक कामाकडे लक्ष न देता पैशांना महत्त्व देत असा एक टीकेचा सूर असतो. दरम्यान आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारने यावर भाष्य केलं आहे. सतत मेहनतीवर घेतली जाणारी शंका आणि तुलना यावरही आपलं मत मांडलं आहे. 

Galatta शी संवाद साधताना अक्षय कुमारने म्हटलं की, "जेव्हा अभिनेत्यांना पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक असा श्रेणीत टाकलं जातं तेव्हा मला शर्यतीत धावणारा महालक्ष्मीचा घोडा आहे असं वाटतं. हिंदी चित्रपटसृष्टी वर्षाला 190 ते 200 चित्रपट तयार करतं. यानंतर दाक्षिणात्य चित्रपटही आहेत. इतके चित्रपट असताना अभिनेते मात्र 8 ते 12 च आहेत. मग ते पहिला कोण, दुसरा कोण यासाठी का भांडतील? प्रत्येकाकडे काम आहे. दिवसाच्या शेवटी काम असणं महत्त्वाचं आहे".

पुढे तो म्हणाला की, "अनेक लोकांना मी वर्षाला 4 चित्रपट का करतो यावरुन समस्या आहेय मला हे समजत नाही. आयुष्यात पहिल्यांदाच मला तू इतकं काम का करत आहेस अशी विचारणा करत आहे. तुम्हा कधी काम का करता? असा प्रश्न ऐकला आहे का, मी वर्षाला 4 चित्रपट करतो आणि लोकांना यावरुनही समस्या आहे".

अक्षय कुमारनेही सध्या चित्रपटांच्या रिव्ह्यूबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. अक्षयने स्टार्स आणि रिव्ह्वूय विकत घेतले जाऊ शकतात असं स्पष्टपणे सांगितलं. तसंच आपण काही मोजक्या समीक्षकांच्या रिव्ह्यूला महत्त्व देतो असं सांगितलं. “इतके दिवस इंडस्ट्रीमध्ये राहून तुम्ही आता कठोर झालेले असता, ज्याचा तुमच्यावर काही परिणाम होत नाही. पण एखादा चांगला समीक्षक बोलतो तेव्हा मात्र त्याची दखल घेतली जाते. मी ते घेतो आणि त्यालाही किंमत करतो. इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्षं राहिल्यानंतर तुम्हाला कोण चांगला टीकाकार आहे आणि कोण वाईट आहे हे समजतं. आम्हाला माहित आहे की लोक स्टार्स, रिव्ह्यू अशा काही गोष्टी विकत घेतात. मी चांगल्या समक्षीकांना वाचल्यानंतर त्याची दखल घेतो. पण आता कोणीही उठून येतं, खूप गोंधळ झाला आहे," असं अक्षय म्हणाला.

चित्रपटांबद्दल बोलायचं गेल्यास अक्षय कुमारचे अलीकडील चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'मिशन राणीगंज' आणि 'सेल्फी' बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले नाहीत. त्याचा 'सरफिरा' चित्रपट 12 जुलैला प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तामिळ चित्रपट 'सूरराई पोत्रू'चा हिंदी रिमेक आहे. जीआर गोपीनाथ यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे ज्यांनी सामान्य माणसाला परवडणारी विमानप्रवास शक्य केली.