International Yoga Day : 'मला शवासन आवडतं...'; कारण वाचा, तुम्हालाही पटेल

व्यायामाची आवड असणाऱ्यांसाठी तर आणखीनच अभिमानास्पद वाटावं असा हा दिवस

Updated: Jun 21, 2022, 07:05 AM IST
International Yoga Day : 'मला शवासन आवडतं...'; कारण वाचा, तुम्हालाही पटेल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

सुवर्णा धानोरकर, मुंबई : International Yoga Day : आजवर 21 जून म्हणजे मोठा दिवस येवढंच आपल्याला माहित होतं. पण आठ वर्षापूर्वी हा दिवस भारतीयांसाठी आणखी विशेष झाला आणि व्यायामाची आवड असणाऱ्यांसाठी तर आणखीनच अभिमानास्पद वाटावं असा हा दिवस... कारण 21 जूनला जागतिक योग दिन साजरा व्हायला लागला. (International Yoga Day 2022 blog importance and significance of yoga)

जगभरातल्या अनेक देशांमध्ये योगासनं केली जात असली तरी, सुमारे 12 देशांनी योगासनांना अधिकृत मान्यता दिलीय. योगासनांवरची सध्याची उलाढाल ही 400 अब्जांच्या आसपास आहे. अमेरिकेत योगासनांना सर्वाधिक पसंती आहे. पण कोविड काळात योगासनं करणा-यांचा आकडा थोडा कमी झाला. पण गेल्या सहा ते सात महिन्यांपासून हा आकडा पुन्हा वाढायला लागलाय. सद्यस्थती जगभरात सुमारे 850 दशलक्ष लोक योगासनं करतात. त्यातले 44 टक्के लोक आठवड्यातून 3 दिवस योगासनं करतात. जगभरातली 37 टक्के मुलंही योगासनं करतात. असं म्हणतात की शंकरानं कैलास पर्वतावर असताना सुमारे 84 लाख योगासनं केली. त्यावेळी तिथे सप्तऋषी येऊन बसले. तेही पूर्ण काळ तिथेच थांबले. त्यावेळी त्यांना शंकरानं शिष्य म्हणून स्वीकारलं. 

जगभरात योगासनांचे अनेक प्रकार आता आढळतात. त्यात विशेष पसंती हठ योग, अय्यंगार योग, क्रियायोग, कुंडलिनी योग, अष्टांग योग जास्त लोकप्रिय आहेत. पण अजूनही भारतीयांमध्ये योगासनांविषयी फारशी जागरुकता नाही असंचं म्हणावं लागेल. कारण सव्वाशे कोटींच्या भारतीयांमध्ये फक्त ७टक्केच भारतीय योगासनं करतात.

योगासनं आणि समज-गैरसमज

अजुनही आपल्याला योगासनं म्हणजे वजन कमी करण्यासाठी व्यायाम असंच वाटतं... पण हा गैरसमज आधी मनातून काढून टाका. योगासनं ही तुमची स्ट्रेन्ग्थ वाढवतात. आयुष्यात घडणा-या प्रत्येक घटनेविषयी विचार करण्याची वेगळी दिशा तुम्हाला देतात. जीवनातल्या प्रत्येक चांगल्या वाईट घटनेला ताकदीनं फेस करण्याची क्षमता देतात. स्वत:च्या समस्या तुम्हाला समस्या वाटत नाहीत. त्यांना तुम्ही संधी समजता. पावलोपावली भेटणा-या, समोर येणा-या प्रत्येक व्यक्तीला सन्मान देण्याची समज देतात. प्रत्येक व्यक्तीची क्षमता ओळखण्याची नजर देतात. 

समोरच्यामध्ये असलेलं नैराश्य पळवण्यासाठी त्याला मदत करण्याची सवय तुम्हाला देतात. प्रत्येकाच्याबाबतीत तुम्ही क्षमाशील होता. समरसून योगासनं केली तर एक वेळ अशी येते की तुम्ही तुमच्यातला देव ओळखता. त्याच्याशी संवाद साधता. तुमच्या जवळच्या, दुरच्या व्यक्तींच्या समस्या त्या देवाला सांगता त्यावर उत्तर मागता. समोर येणा-या प्रत्येक व्यक्तीला ओंजळभर सकारात्मकता आणि आईची माया देता. याहीपुढे गेलात तर प्रत्येक संधीचं सोनं करता.

हे सगळ्ळ सगळ्ळ मिळतं पण तुम्ही समरसून योगासनं केली, योगासनांवर विश्वास ठेवलात तर आणि तरच... हवंय हे सगळं? मग करा योगासनं.

अरेच्चा आपण तर रोजच आसनं करतोच

साधी सोपी रोज आपण करत असलेल्याच काही हालचालींमधून योगासनं घडत असतात. मला व्यायाम करायला वेळ नाही असं आपण म्हणतो. पण हे खरं आहे का...? रोज शवासन करता? हो! रोज ताडासन करता? हो! रोज मलासन करता? हो! रोज मार्जरासन करता? हो! रोज जानुनासन करता?हो! रोज उत्कटासन करता? हो! बघा रोज किमान पाच ते सहा आसनं आपण करतोच करतो. गृहिणींची जरा जास्तच आसनं होतात. या आसनांमधली काही नावं तुम्हाला माहितीयत. पण ही आसनं आपण कधी करतो, असा प्रश्न पडला असेल... बघा! रोज आपण शवासन करतो म्हणजे झोपतो. झोपून उठल्यावर उभं राहिलो की सगळं अंग ताणून हात वर नेतो पाय ताणतो आळस काढतो म्हणजे ताडासन...मग मलासन करतो, म्हणजे भारतीय पद्धतीच्या शौचालयात बसतो. 

दिवसभरात किमान दहा पंधरावेळा खाली वाकतो म्हणजे जानुनासन... दिवसभरातले किमान 9 तास बसतो म्हणजे उत्कटासन... झोपण्यापूर्वी अंथरुणावर गेलो की मांजरीसारखे गादीवर उभे राहतो म्हणेज मार्जरासन... फरक असा की आपण ही आसनं रोजचं काम किंवा कामाचा भाग म्हणून करतो. बाकी व्यायाम न करणा-या कुणापुढेही योगासनांचं नाव काढा लगेच छान पाच दहा सेमी हसून सांगणार मला शवासन येतं आणि मी तेच रोज करतो/करते. 

शवासन शरीराची गरज आहे. पण आपण जे शवासन करतो ते बरोबर आहे का... उत्तर तुमचं तुम्हालाच मिळेल. शवासन करून जेव्हा डोळे उघडता तेव्हा छान फ्रेश वाटतं का? उत्तर नाही असं आलं तर तुमचं शवासन चुकलं. कसं ते सांगते. शवासन म्हणजे शरीराला शांत करणं. भरभरून श्वास घेणं. इतका भरभरून की पायाच्या नखापासून डोक्यावरच्या केसाच्या टोकापर्यंत ऑक्सिजन पोहचावा. आपल्या प्रत्येक अवयवाशी बोलणं , बाबा रे, तु आहेस म्हणून मी आहे, तेव्हा तुझ्याकडे दुर्लक्ष होत असेल तर लगेच सांग रे बाबा. मी तुला गृहित धरत असेन तर तसं मला काहीतरी दुखवून कळव रे बाबा... हवेतला प्राणवायू तुला देतोय तो घे रे बाबा... तुमचं मन त्या प्रत्येक अवयवाशी एकरूप करा. प्रत्येक अवयवाचे आभार माना. दीर्घ श्वास घ्या. प्रत्येक उश्वासातून नकारात्मक विचार आयुष्यातले नकारात्मक प्रसंग अनंतात विलीन करा. बघा मग उठल्यावर फ्रेश वाटतंय की नाही.

योगासनं फॅशन म्हणून नाही पॅशन म्हणून करा. कामाचा भाग म्हणून नाही जीवनातला अविभाज्य घटक म्हणून करा. रोज श्वास घेता तसा रोज व्यायाम करा. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर योगासनं करा. मी म्हणते म्हणून शवासन तरी कराच.