Viral Video: ....अन् धडकेनंतर कार तब्बल 120 फूट उंच हवेत उडाली, अपघात पाहून अंगावर काटा येईल

Viral Video: जॉर्जिया (Georgia) येथे भीषण अपघात झाला आहे. वेगात धावणारी कार टो ट्रकच्या रॅम्पवर चढल्यानंतर तब्बल 120 फूट उंच हवेत उडाली. हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला असून अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 1, 2023, 03:46 PM IST
Viral Video: ....अन् धडकेनंतर कार तब्बल 120 फूट उंच हवेत उडाली, अपघात पाहून अंगावर काटा येईल title=

Viral Video: तुम्ही अपघाताचे अनेक व्हिडीओ, फोटो पाहिले असतील. पण सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेला एक व्हिडीओ (Viral Video) पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल. कारण या अपघातात कार तब्बल 120 फूट उंच हवेत उडाली आहे. कार इतक्या वेगात होती की, टो ट्रकच्या रॅमवर चढल्यानंतर काही वेळ अक्षरश: हवेत होती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही वेळासाठी हे एखाद्या चित्रपटाचं शुटिंग सुरु आहे का असं वाटेल. 

अमेरिकेतील जॉर्जिया येथे हा अपघात झाला आहे. घटनास्थळी अपघात झाला असल्याने पोलीस उपस्थित होते. त्यांच्यासमोरच हा अपघात झाला. अपघातानंतर कार हवेत उडाल्यानंतर रस्त्यावरुन जाणाऱ्या एका कारवर जाऊन आदळली. विशेष म्हणजे इतक्या भीषण अपघातातून चालक बचावला आहे. मात्र तो गंभीर जखमी झाली आहे. 

नेमकं काय झालं?

24 मे रोजी ही घटना घडली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, अपघात झाल्यामुळे Lowndes County Sheriff कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, घटनास्थळी एक कार पलटी झाली होती. पोलिसांनी ही कार नेण्यासाठी एक टो ट्रक आणला होता. गाडी वर चढवायची असल्याने टो ट्रकचा रॅम्प खालच्या दिशेला ठेवण्यात आला होता. 

हायवेवर पोलीस उभे असतानाच एक कार ट्रकच्या मागून दिशेने वेगात येते. समोर टो ट्रक असल्याचा अंदाज कदाचित चालकाला आला नसावा. यामुळे कार थेट रॅम्पवर चढते आणि त्यानंतर जवळपास 120 फूट उंच हवेत उडते. यानंतर ती पुढे जाऊन कोसळते. कार कोसळते तेव्हा आणखी एक गाडी तेथून जात होती. ही कार खाली पडताना त्याच कारवर पडताना दिसत आहे. 

कार खाली कोसळल्यानंतर तिचा अक्षरश: चुराडा होताना दिसत आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या बॉडीकॅम मध्ये हा सर्व अपघात कैद झाला आहे. दरम्यान, इतक्या भीषण अपघातात एखादी व्यक्ती वाचणं तसं कठीणच आहे. पण चालक बचावला असून, तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.