शिर्डीत भाजप शत् प्रतिशत, राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा

आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभेला महायुती म्हणून एकत्र लढल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळाची भाषा केली आहे. 

पुजा पवार | Updated: Jan 18, 2025, 07:34 PM IST
शिर्डीत भाजप शत् प्रतिशत, राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा  title=
(Photo Credit : Social Media)

सीमा आढे (प्रतिनिधी) शिर्डी : नुकत्याच झालेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रानं महायुतीच्या पदरात भरभरून मतांचं दान टाकलं. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात बहुमतानं महायुती सत्तारूढ झाली. आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभेला महायुती म्हणून एकत्र लढल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळाची भाषा केली आहे. युती झाली तर ठीक नाहीतर राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायला तयार आहे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटलांनी घेतली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार झिशान सिद्दीकी यांनीही दिलीप वळसे पाटलांच्या सुरात सूर मिळवलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळाची भाषा केल्यानंतर भाजपमधून प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर सावध प्रतिक्रिया दिलीये. शक्य असेल त्याठिकाणी महायुतीमधूनच लढणार असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं आहे. 

हेही वाचा : कोल्हापुरात टक्कल पडलेल्यांच्या रांगा; अनोख्या औषधामुळे टक्कल जाऊन केस येणार असल्याचा दावा

 

शिर्डीमधून भाजपनं शत प्रतिशतचा नारा दिलाय, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महायुती कशी सामोरी जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.