Anjali Damania Interview : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 'झी 24 तास'च्या 'टू द पॉइंट' विशेष कार्यक्रमात विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले.अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी या लाभाच्या पदावर असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. वाल्मिक कराडला जुलै 2022 ते डिसेंबर 2024 पर्यंत पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. नेमक्या याच काळात वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे दाखल झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय. दरम्यान अंजली दमानिया ट्रोलिंगला कशा सामोऱ्या जातात? त्यांना खळबळजनक माहिती कशी काय मिळते? त्या किती टॅक्स भरतात? असे अनेक प्रश्न विचारले जातात. अंजली दमानिया यांनी 'टू द पॉइंट' कार्यक्रमात या सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली आहेत.
बड्या राजकारण्यांचे आर्थिक गैरव्यवहार बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांना माहिती कुठून मिळते? असा प्रश्न विचारला जातो. त्यावर बोलताना मी ऑनलाइन माध्यमातून ही माहिती काढते. त्याचे सोर्सही समोर ठेवते. याची प्रिंट घेऊन मी सरकारी कार्यालयात जाते, असे त्या म्हणाल्या.
शरद पवार, जितेंद्र आव्हाड मंचावर येणार हे कळल्यावर मी त्या मंचावर गेले नाही. आज सुरेश धस आका आका म्हणून बोलत आहेत. असे म्हणून ते तर भविष्यातले आका बनू पाहत नाहीत ना? उद्या वरिष्ठांनी सांगितलं तर तेही शांत राहतील. अशा सर्व कारणामुंळे मी राजकारण्यांसोबत मंचावर येण्यापासून दूर राहते, असे अंजली दमानियांनी सांगितले.
बी टीम म्हणून काम करतात. सुपारीबाज बाई आहे, रिचार्ज वर चालणारी बाई अशा ट्रोलिंगला दमानियांना सामारे जावे लागते. यावरही त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. मी आणि माझ्या नवऱ्याने 2 कोटी 8 लाख 81 हजार इतका आयकर आम्ही भरलाय. यावरुन तुम्ही आमचे उत्पन्न किती असेल याचा अंदाज लावू शकता. माझ्या घरात 1 रुपयांचाही काळा पैसा येत नाही, असा टोला त्यांनी ट्रोलर्सना लगावलाय.
मी कधीच कोणाची जात पाहीली नाही. मी कोणत्या समाजाची आहे हे कोणाला माहिती नसेल. मला त्यात पडायचेही नाही. मी कोणत्या समाजाविरोधात नाही. तरीही वंजारी समाजाविरोधात बोलल्या असा अजेंडा राबवण्यात आला. माझा नंबर व्हायरल करण्यात आला. मी त्यांचे नंबर घेऊन ट्रूकॉलरवर टाकले. त्यावेळी वाल्मिक कराड, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांचे समर्थक होते. त्यांचे इंस्टाग्रामवर खूप रिल्स होते. एकाच्या फेसबुकवर माझा मोबाईल नंबर देण्यात आला होता, असे दमानियांनी सांगितले.
तुमचे नंबर सगळीकडे शेअर केले जातात. तुमची बदनामी केली जाते. याचा घरच्यांवर काय परिणाम होतो. आता थांबायला हवं असं कधी घरचे म्हणतात का? असा प्रश्न दमानियांना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, 'आधी माझा नंबर रेल्वेमध्ये लावण्यात आला होता. खट्टीमिठी बाते करण्यासाठी हा नंबर असे लिहिले होते. भुसावळमधून पुढे जाणाऱ्या ट्रेनमध्ये हे नंबर लावण्यात आले होते. 6 डिफमेशन केस, 4 एफआयआर करण्यात आल्या. इकडनं तिकडे पळवा', असे चालले होते.
'एक दिवशी मला फोन आला. खडसेविरोधात बोलायचे बंद कर, तू फॅमिलीवाली आहेस ना? तो नंबर ट्रू कॉलरवर दाऊद 2 असा दिसला. पाकिस्तानचा नंबर होता. मी तो पोलिसांकडे दिला पण त्याचं काय झालं? मला अद्याप कळालं नाही. त्यावेळी आता बस्स झालं असं मला घरच्यांनी सांगितलं. पण सर्वांनीच शांत राहीलं तर बोलायचं कोणी? म्हणून मी हा लढा चालू ठेवल्याचे' अंजली दमानिया यांनी सांगितले.