मुंबई : सुधारणावादी विचारांचा दावा करणाऱ्या तालिबान्यांचा (Taliban) बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे. आम्ही कुणाच्या हक्कावर गदा आणणार नाही. महिलांच्या शिक्षणाचा हक्क अबाधित राखू असं म्हणणाऱ्या तालिबाननं आता एक अजब फतवाच जारी केला आहे. अफगाणिस्तानात (Afghanistan) आता यापुढे शाळा कॉलेजांमध्ये मुला-मुलींना एकत्र शिकता येणार नाही.
अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबान्यांनी आपला खरा चेहरा दाखवून दिला आहे. आम्ही महिलांना शिक्षणापासून (Women Education) रोखणार नाही, त्यांचे हक्क अबाधित राखू असं सांगणाऱ्या तालिबान्यांनी आता एक अजब फतवा जारी केला आहे. ज्यात मुला-मुलींना यापुढे एकत्र शिकता येणार नाही असं म्हटलं आहे. खामा न्यूजला दिलेल्या मुलाखतीत तालिबानच्या शिक्षण मंत्रालयाचे प्रमुख अब्दुल हक्कानी (Abdul Haqqani) यांनी ही फतवा काढला आहे.
खामा न्यूजच्या रिपोर्टनुसार नव्या शासन प्रणालीत मुलींना शिक्षणाचा अधिकार असेल. मात्र त्यांना मुलांसोबत एकत्र शिकता येणार नाही. मुस्लीम कायद्यानुसार त्यांना वेगवेगळ्या वर्गात बसून शिकावं लागेल. तशा सूचना सरकारी आणि खासगी महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत असंही हक्कानी यांनी म्हंटलं आहे.
तालिबान्यांच्या फतव्यामुळे अफगाणिस्तानातील मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. मुळात मुला-मुलींना स्वतंत्रपणे शिक्षण देण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ आणि बैठक व्यवस्था इथल्या महाविद्यालयांमध्ये नाही. त्यामुळे स्वाभाविकच या निर्णयांमुळे विद्यार्थिनींच्या संख्येत घट होईल.
महिलांना शिक्षणापासून रोखणं हा धर्मांध तालिबान्यांचा सुरूवातीपासूनच अजेंडा राहिला आहे. त्यामुळे बदलल्याचा कितीही आव आणला तरी तालिबान्यांचा खरा चेहरा उघड झाल्याचं या फतव्यातून स्पष्ट होत आहे.