Russian 8 Children: देशातील महिलांनी किमान आठ मुले जन्माला घालण्याचे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केले आहे. मोठ्या कुटुंबांना 'आदर्श' बनवण्याच्या दिशेने लोकांनी काम करावे, असे त्यांनी आवाहन केले. जगभरात लोकसंख्या वाढीचा प्रश्न उद्धवत असताना पुतिन यांनी असे आवाहन का केले? असा प्रश्न उपस्थित होतोय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
रशियाला लोकसंख्येच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. जन्मदरातील घसरण आणि युक्रेनबरोबरच्या युद्धात सतत सैनिक शहीद होणे, अशा दुहेरी संकटात रशिया सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मॉस्कोमध्ये जागतिक रशियन पीपल्स काऊन्सिलला व्हिडिओद्वारे संबोधित करताना त्यांनी या गोष्टी सांगितल्या.
येत्या काही दशकांत रशियन लोकसंख्या वाढवणे आणि भावी पिढ्यांसाठी ती जतन करणे हे आपले लक्ष्य असल्याचे पुतिन म्हणाले. आमच्या अनेक आदिवासी गटांनी चार, पाच किंवा त्याहून अधिक मुले असलेली बहुजनीय कुटुंबे असण्याची परंपरा जपली आहे. रशियन कुटुंबांमध्ये आमच्या अनेक आजी आणि पणजींना सात, आठ किंवा त्याहून अधिक मुले होती, याची आठवण त्यांनी करुन दिली. आता रशियन संस्कृतीचे "जतन आणि पुनरुज्जीवन" करण्याची वेळ आली आहे. मोठे कुटुंब रशियामध्ये जीवनाचा एक आदर्श मार्ग बनला पाहिजे. कुटुंब हा केवळ राज्याचा आणि समाजाचा पाया नसून ती एक आध्यात्मिक घटना आहे, नैतिकतेचा स्रोत असल्याचे ते म्हणाले.
रशियन राष्ट्राध्यक्षांनी लोकसंख्या वाढवण्यासाठी आर्थिक मदतीसोबत भत्ते आणि विशेषाधिकार देण्यावरही तसेच कठीण लोकसंख्याशास्त्रीय आव्हानांना सामोरे जाण्यावरही त्यांनी भाष्य केले. कुटुंब आणि मुलाचा जन्म प्रेम, विश्वास आणि भक्कम नैतिक पायावर बांधला जातो. हे आपण कधीही विसरू नये. सर्व रशियन सार्वजनिक संस्था आणि पारंपारिक धर्मांनी कुटुंबे मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि हे "सहस्राब्दी-जुन्या, शाश्वत रशिया" चे भविष्य असले पाहिजे, असे पुतिन म्हणाले.
युक्रेनबरोबरच्या युद्धात मारल्या गेलेल्या रशियन सैनिकांच्या संख्येची धक्कादायक आकडेवारी जाहीर केली होती. त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार रशियाचे 3 लाख जवान शहीद झाले आहेत.
1 जानेवारी 2023 पर्यंत देशाची लोकसंख्या 14 कोटी 64 लाख 47 हजार 424 होती. पुतिन 1999 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले तेव्हाच्या तुलनेत ही लोकसंख्या कमी आहे. सरकारी वृत्तसंस्था (TASS) ने अहवालातून ही माहिती दिली आहे.