ढाका : पाकिस्ताननंतर आता बांग्लादेशातील हिंदुंवर हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी हिंदुंच्या घरांना आग लावली. तसेच मंदिरांचेही नुकसान केले आहे. ही घटना बांग्लादेशातील खुलना जिल्ह्यातील शियाली गावात घडली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, या घटनेबाबत 10 लोकांना अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंदिरांमधील मूर्ती खंडीत
ढाका ट्रिब्यूनच्या रिपोर्ट नुसार, 7 ऑगस्ट रोजी बांग्लादेशात काही कट्टरतावाद्यांनी अल्पसंख्यांक हिंदू समुदायाच्या घरांवर, दुकानांवर हल्ला केला. अनेक मंदिरांची तोडफोड केली. सुरूवातीला चार मंदिरांमध्ये तोडफोड केली गेल्याची माहिती मिळाली. तसेच आजुबाजूच्या गावातील लोकांनीही मंदिर तोडफोमध्ये भाग घेतला.
30 हून अधिक लोक जखमी
मारझोडमध्ये 30 हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर जवळच्या सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार गावातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. याप्रकरणी 10 लोकांना अटक करण्यात आली आहे.
ढाका ट्रिब्यूनच्या रिपोर्टच्या मते शु्क्रवारी रात्री 9 वाजेदरम्यान, हिंदू श्रद्धाळूंच्या एका समुहाने पूर्व पारा मंदिर ते शियाली स्मशानभूमीपर्यत कीर्तन करीत मिरवणूक काढली. रस्त्यात एक मशिद होती. तेथील इमामने मिरवणूकीला विरोध केला. हिंदू श्रद्धाळू आणि इमाम यांच्यात वाद झाला आणि या वादाला दंगलीचे स्वरूप मिळाले. या दंगलीत हिंदू कुटूंबांना आणि मंदिरांना लक्ष केले गेले.