बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून पाकिस्तानात दाखल झालेल्या 30 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. फेसबुकवरुन मैत्री झालेल्या आपल्या पाकिस्तानी मैत्रिणीशी लग्न करण्याच्या हेतूने तरुण बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. पण यावेळी मैत्रीण दूर राहिली, याउलट जेलमध्ये पोहोचला. महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मैत्रिणीने पाकिस्तानमधील स्थानिक पोलिसांना आपल्याला त्याच्याशी लग्न करायचं नाही असं सांगितल्याने त्याची अडचण आणखी वाढली आहे.
बाबूने आपण लग्न करू इच्छिणाऱ्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बाबूची फेसबुक मैत्रीण २१ वर्षीय सना राणी हिचा जबाब नोंदवला आहे, तिने म्हटलं आहे की, तिला त्याच्याशी लग्न करण्यास रस नाही.
"पोलिसांना दिलेल्या जबाबात सना राणी म्हणते की बाबू आणि ती गेल्या अडीच वर्षांपासून फेसबुकवर मित्र आहे. पण तिला त्याच्याशी लग्न करण्यास रस नाही," असं पंजाब पोलीस अधिकारी नासिर शाह यांनी गुरुवारी पीटीआयला सांगितलं.
त्याने सांगितलं की, बाबू बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून मंडी बहाउद्दीनमधील सना राणीच्या मौंग गावात पोहोचला. तिथे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. बाबू राणीला भेटला का? असं विचारलं असता पोलिस अधिकाऱ्याने आपण याबाबात नेमकं सांगू शकत नाही असं म्हटलं.
दबावाखाली येऊन राणीने बाबूशी लग्न करण्यास नकार दिला का? याचीही पुष्टी झालेली नाही. तथापि, एका सूत्राने पीटीआयला सांगितलं की, एका गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी बाबूशी असलेल्या तिच्या संबंधांबद्दल राणी आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांची चौकशी केली.
अटक केल्यानंतर, बाबूने पोलिसांना त्याची "प्रेमकथा" सांगितली. बाबूने कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांशिवाय प्रवास केल्यामुळे पाकिस्तानच्या परराष्ट्र कायद्याच्या कलम 13 आणि 14 अंतर्गत त्याला ताब्यात घेण्यात आलें. नंतर, त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील सुनावणी 10 जानेवारीला होणार आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमात पडत एखाद्या भारतीयाने पाकिस्तानात प्रवेश करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, अंजू नावाची एक भारतीय महिला तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेली होती. तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि नसरुल्लाह या पाकिस्तानी तरुणाशी लग्न केलं.
गेल्या वर्षी, सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेने पबजी गेमच्या माध्यमातून एका भारतीय पुरुषाशी मैत्री केली. ती तिच्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली आणि नंतर त्याच्याशी लग्न केलं. त्याचप्रमाणे, गेल्या वर्षी, 19 वर्षीय पाकिस्तानी मुलगी इकरा जिवानी हिने ऑनलाइन गेमद्वारे 25 वर्षीय भारतीय नागरिक मुलायम सिंह यादव याच्याशी मैत्री केली. इकरा आणि मुलायम यांनी नंतर नेपाळमध्ये लग्न केलं.