नवी दिल्ली : सध्या टॅटू ही एक लोकप्रिय फॅशन झाली आहे. पण, कॅनडातील एका मॉडेलला टॅटू काढणं महागात पडलं आहे.
कॅट गलिंगर नावाच्या मॉडेलला आपल्या डोळ्याच्या आत टॅटू बनवायचा होता. त्यासाठी कॅट टॅटू काढण्यासाठी गेली. मात्र, हा टॅटू काढल्यामुळे तिला आपल्या डोळ्यांची दृष्टी गमवावी लागली आहे.
टॅटू बनवताना झालेल्या एका चुकीमुळे मॉडेलला मोठा फटका बसला आहे. या घटनेनंतर कॅट गलिंगरने आपल्या फेसबुकवर फोटो शेअर करत घटनेची माहिती दिली आहे. आता गलिंगरने आपल्या एका डोळ्याची दृष्टी गमावली आहे.
२४ वर्षांची गलिंगरने जे फोटोज शेअर केले आहेत त्यामध्ये तिच्या डोळ्यातून लिक्विड बाहेर पडताना दिसत आहे. तसेच डोळ्याला किती इजा झाली आहे हे सुद्धा दिसत आहे. गलिंगरने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, डोळ्यातून लिक्विड निघण्यास सुरुवात होताच ती रुग्णालयात गेली.
रुग्णालयातील डॉक्टरांनी गलिंगरला अँटीबायोटिक आय ड्रॉप दिलं मात्र, या ड्रॉपचा उलटा प्रभाव झाला आणि त्यानंतर तिच्या डोळ्याला सूज आली.
एका आठवड्यानंतर गलिंगरला अंधूक दिसण्यास सुरुवात झाली. डॉक्टरांच्या मते टॅटू काढत असताना ज्या उपकरणाचा वापर केला त्यामुळे तिला स्पष्ट दिसत नाहीये आणि नंतर त्याचा प्रभाव संपूर्ण डोळ्यावर झाला.