अरेरे! गायक झाला भाजीवाला; कोणाच्या दहशतीमुळं ओढावलं हे संकट ?

अनेकांनी जगण्याच्या वाटाही बदलल्या. 

Updated: Aug 26, 2021, 10:22 PM IST
अरेरे! गायक झाला भाजीवाला; कोणाच्या दहशतीमुळं ओढावलं हे संकट ?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : जीवन फारच क्षणिक आहे. इथं कधी, कुठं आणि काय घडेल सांगता येत नाही. राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही, या ओळीचा खरा प्रत्यय जीवनातील विविध प्रसंगांतून पाहायला मिळतो. आयुष्याच्या या प्रवासावर निघालेलं असताना कमी जास्त प्रमाणात संघर्ष सर्वांनाच करावा लागतो. पण, काही व्यक्तींच्या वाट्याला आलेली ही संघर्षाची सत्वपरीक्षा काही केल्या संपण्याचं नावच घेत नाही. 

सध्या अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) याचीच प्रचिती पावलोपावली येत आहे. जिथं माजलेल्या अराजकतेचा फटका जनसामान्यांवर बसत आहे. अफगाणिस्तानात तालिबान राज (Taliban) सुरु होताच परिस्थिती आणखी चिघळली. अनेकांनी जगण्याच्या वाटाही बदलल्या. इथं हेलमंद प्रांतात राहणाऱ्या गायक हबीबुल्लाह शबाबला आता गायनाच्या क्षेत्रात पुढं यायचं नसून, त्याला भाज्या विकण्याचाच व्यवसाय पुढं सुरु ठेवायला आहे. 

हबीबुल्लाह हा अफगाणिस्तानातील लोकप्रिय गायक असून, त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर विशेषत: युट्यूबवर प्रसिद्ध आहेत. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यामुळं देशातील परिस्थिती दिवसागणिक बिघडतच चालली आहे. गायकांची परिस्थितीही काही वेगळी नाही, असंही त्यानं सांगितलं. 

अफगाणिस्तानातून अनेक नागरिकांनी पलायन केलं आहे, असं सांगत हबीबुल्लाहनं आपल्या बिकट परिस्थितीचं चित्र एका मुलाखतीत सर्वांसमोर आणलं. अनेक कलाकार देश सोडून निघून गेले आहेत. अशा वेळी हेच स्पष्ट होत आहे की, लोकांना इथं कौशल्य जपण्यापेक्षा शांततेनं आयुष्य जगणं महत्त्वाचं वाटत आहे, हे कटू सत्य त्यानं मांडत आपला निर्णय सर्वांपुढं ठेवला.