एकतर प्रियकर किंवा संपत्ती? वडिलांनी दिला पर्याय, मुलीने 2484 कोटींच्या प्रॉपर्टीवर मारली लाथ

प्रियकरासह लग्न करण्यासाठी मलेशियातील एका तरुणीने तब्बल 2484 कोटींच्या संपत्तीचा वारसा सोडला. मलेशियातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबातील अँजेलिन फ्रान्सिसची प्रेमकथा सध्या चांगलीच गाजत असून चर्चेचा विषय ठरत आहे. अँजेलिनला तिच्या वडिलांनी प्रियकर किंवा संपत्ती यापैकी एकाची निवड करण्यास सांगितलं होतं.   

शिवराज यादव | Updated: Aug 15, 2023, 08:01 PM IST
एकतर प्रियकर किंवा संपत्ती? वडिलांनी दिला पर्याय, मुलीने 2484 कोटींच्या प्रॉपर्टीवर मारली लाथ title=

एकतर संपत्ती निवड किंवा प्रियकर....हा डायलॉग तुम्ही बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये ऐकला असेल. अत्यंत फिल्मी स्टाईल असणाऱ्या या लव्हस्टोरी खऱ्या आयुष्यातही असतात का असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडत असतो. प्रेमासाठी खरंच कोणी आपली करोडोंची संपत्ती सोडू शकतं का? तुम्हीही असा विचार करत असाल तर तंतोतंत अशी एक घटना घडली आहे, जी सध्या संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. मलेशियामधील एका तरुणीने आपल्या प्रियकरासह लग्न करण्यासाठी तब्बल 2484 कोटींच्या संपत्तीचा वारसा सोडला आहे. 

मलेशियामधील एका लव्हस्टोरीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. याचं कारण महिलेने प्रेम आणि पैशांमध्ये प्रेमाला निवडत करोडोंची संपत्ती सोडून दिली आहे. मलेशियातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबातील अँजेलिन फ्रान्सिसची ही प्रेमकथा आहे. अँजेलिनाचे वडील हे प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांनी अँजेलिनला प्रियकर किंवा संपत्ती यापैकी एकाची निवड करण्यास सांगितलं होतं. पण अँजेलिनासाठी हा फार कठीण प्रश्न नव्हता. कारण तिच्यासाठी प्रेमच सर्व काही होतं. 

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना अँजेलिनाची भेट जेदिडिया फ्रान्सिसशी झाली. आपली प्रेमकथा फार विलक्षण असल्याचं हे जोडपं सांगतं. पण जेदिडिया फार श्रीमंत नसल्याने तो आपली आर्थिक बरोबरी करु शकत नाही असं सांगत अँजेलिनच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली होती. 

जेव्हा या जोडप्याने आपलं प्रेम व्यक्त केलं आणि एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा अँजेलनिच्या वडिलांनी त्यांना अल्टीमेटम जारी केला. एकतर वारसा हक्कांचा त्याग कर किंवा हे नातं संपवं असा पर्याय त्यांनी मुलीला दिला. यानंतर अँजेलिन फ्रान्सिसने प्रेमाची निवड केली आणि तिच्या कुटुंबाचा समृद्ध वारसा मागे सोडला.

अँजेलनिने तिच्या आयुष्यातील प्रेम निवडण्याचा निर्णय घेत पालकांपासून दूर होण्याचं ठरवलं. परंतु नंतर तिच्या वडिलांच्या आणि आईच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान तिला बोलावण्यात आले. अँजेलिन फ्रान्सिसने तिच्या आईने केलेला त्याग आणि वडिलांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी किती परिश्रम घेतले याबद्दल न्यायालयात साक्ष दिली.

अँजेलिन फ्रान्सिस आणि जेदीडिया फ्रान्सिस यांच्या प्रेमकथेने भौगोलिक सीमा ओलांडत अनेकांना प्रेरणा दिली आहे. जीवनात योग्य गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी ते इतरांना प्रेरित करत आहेत.